कोल्हापुरातील राजेंद्रनगरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका, वर्चस्ववादाचा संघर्ष; पोलिसांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 12:45 PM2022-11-15T12:45:02+5:302022-11-15T12:45:28+5:30

राजेंद्रनगर परिसरात वाढलेली झोपडपट्टी गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे.

Another gang war in Kolhapur Rajendranagar, The Struggle for Supremacy, A challenge to the police | कोल्हापुरातील राजेंद्रनगरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका, वर्चस्ववादाचा संघर्ष; पोलिसांसमोर आव्हान

कोल्हापुरातील राजेंद्रनगरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका, वर्चस्ववादाचा संघर्ष; पोलिसांसमोर आव्हान

googlenewsNext

कोल्हापूर : राजेंद्रनगरचा इतिहास तसा रक्तरंजितच आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार खंडू कांबळे, सौदागर कांबळे अशा अनेक गुंडांची दहशत या परिसराने अनुभवली आहे. पोलिसांनी प्रमुख गुंडांच्या मुसक्या आवळल्यानंतर गेल्या तीन-चार वर्षांपासून हा परिसर काहीसा शांत होता. मात्र, नव्याने निर्माण झालेल्या गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्षामुळे राजेंद्रनगरात पुन्हा गुन्हेगारी फोफावली आहे.

राजेंद्रनगर परिसरात वाढलेली झोपडपट्टी गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे. हातावरचे पोट असलेली शेकडो कुटुंब या परिसरात दाटीवाटीने राहतात. अल्पशिक्षण, संस्कारांचा अभाव आणि खाण्या-पिण्याचे वांदे अशा कुटुंबातील अनेक तरुण झटपट पैसा कमविण्याच्या नादात अवैध धंद्यांमध्ये गुंतले आहेत. बेकायदेशीर दारू विक्री, गांजाची तस्करी, विक्री, प्लॉटचे व्यवहार करणे, खासगी सावकारी आणि व्यावसायिकांना धमकावून पैसे उकळणारा रोज नवा गुंड या परिसरात तयार होत आहे. अगदी १८-२० वर्षांचे तरुण टोळ्या तयार करून आपली दहशत वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच राजेंद्रनगरात मारामारी, दमदाटी, जमावाकडून दहशत निर्माण करण्याचे गुन्हे वाढले आहेत.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार खंडू कांबळे, सौदागर कांबळे यांच्यासह काही गुंडांवर कारवाई झाल्यानंतर राजेंद्रनगरातील गुंडगिरीचे प्रमाण काहीसे कमी झाले होते. मात्र, चार वर्षांपूर्वी काही नव्या टोळ्या उदयाला आल्या. कुमार गायकवाड यानेही कमी वयात आपली स्वतंत्र टोळी तयार करून परिसरात दबदबा निर्माण केला होता. मारामारी आणि दमदाटीच्या गुन्ह्यांमध्ये त्याची कारागृहातही रवानगी झाली होती.

वर्षभरापूर्वी तडीपारीचा कालावधी संपल्यानंतर त्याने राजेंद्रनगरात पुन्हा आपले बस्तान बसवले होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह काही तरुणांच्या वाढदिवसांमधून त्याने आपला दबदबा वाढवला होता. परिसरातील एका गुंडाला मारहाण केल्याचाही आरोप त्याच्यावर होता. त्यातूनच कुमार गायकवाडचा काटा काढल्याची चर्चा सुरू आहे. तसेच एका राजकीय पक्षासोबतही त्याची जवळीक वाढली होती.

पुन्हा भडका

कुमार गायकवाडच्या खुनामुळे राजेंद्रनगरातील टोळीयुद्धाचा पुन्हा भडका उडाला असून, त्यातून आणखी रक्तपात होण्याची भीती पोलिसांकडून वर्तविली जात आहे. गुंडांच्या टोळीयुद्धामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. गुंडांच्या दहशतीमुळे राजेंद्रनगरातील प्लॉट खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार ठप्प आहेत.

पोलिसांसमोर आव्हान

राजेंद्रनगरात भुरट्या गुंडांची भाईगिरी आणि अवैध धंदे फोफावले आहेत. याला वेळीच आळा घातला नाही, तर गुंडगिरी मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण होणार आहे.

Web Title: Another gang war in Kolhapur Rajendranagar, The Struggle for Supremacy, A challenge to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.