कागलमध्ये अजून एक गट अदृश्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:22+5:302021-04-25T04:24:22+5:30
कागल : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कागल तालुक्यात मंडलिक, आम्ही एकत्र आहोत. दुसऱ्या बाजूला दोन गट आहेत; ...
कागल :
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कागल तालुक्यात मंडलिक, आम्ही एकत्र आहोत. दुसऱ्या बाजूला दोन गट आहेत; पण त्यातील एक गट अजून अदृश्य आहे. कागल तालुक्यात पन्नासपेक्षा अधिक मतांचे लीड आमच्या पॅनेलला मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. समरजित घाटगे गटाचे नाव न घेता त्यांनी अदृश्य गट अशी टिप्पणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
खासदार संजय मंडलीक यांनी आपल्या भाषणात तालुक्यात आमच्या विरोधात तीन गट आहेत. असे सांगितले. त्याचा संदर्भ घेत मुश्रीफ यांनी ही टिप्पणी केली. गत निवडणुकीत रणजितसिंह पाटील यांनी आमदारकीला मदत केली आहे. म्हणून मुश्रीफसाहेब सत्ताधारी पॅनेलसोबत राहिले, अन्यथा पाच वर्षांपूर्वीच आमचा विजय झाला असता. त्यावेळी आमचा काठावर पराभव झाला. तरी आमचे दोन उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये कागलमधील अमरिश घाटगे होते. ते निवडून आले विरोधी गटातून; पण नंतर ते सत्ताधारी गटाचे झाले, अशी टीका खासदार संजय मंडलिक यांनी केली.
चौकट.
● बाळुमामांचा भंडारा आणि सत्यजीत पाटील..
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सत्ताधारी गटातील विद्यमान संचालक विश्वासराव पाटील, अरुण डोंगळे, आम.राजेश पाटील, सत्यजीत पाटील, चुयेकर कुटुंब आमच्या सोबत आल्याने विजय निश्चित आहे; पण यातील सत्यजीत पाटील सरूडकर बाळुमामांच्या भंडाऱ्याची शपथ घेऊनही परत तिकडे गेले. आता देवच त्यांचे कल्याण करो.