प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली, पैसे कधी येणार?, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 07:06 PM2023-01-18T19:06:52+5:302023-01-18T19:07:18+5:30
बँका व शासन पातळीवरून याबाबत काहीच सांगितले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता
कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी प्रसिद्ध होऊन महिना उलटत आला तरी अद्याप पैसे आलेले नाहीत. बँका व शासन पातळीवरून याबाबत काहीच सांगितले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
राज्य शासनाच्या वतीने पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. पहिल्या यादीतील १ लाख २९ हजार ३१८ पैकी सुमारे १ लाख २१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर २४ डिसेंबरला राज्य शासनाने ५७ हजार ३१० पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर केली. ही यादी प्रसिद्ध होऊन महिना उलटत आला तरी अद्याप पैसे आलेले नाहीत. याबाबत शेतकरीबँकेच्या पातळीवर विचारपूस करत आहेत, मात्र बँकेकडून काहीच सांगितले जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
साडेतीन वर्षे ‘प्रोत्साहन’चे गुऱ्हाळ
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर युती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर निवडणुका संपल्या, सरकार बदलले, त्यात काेराेनामुळे प्रोत्साहन अनुदान लांबत गेले. कोरोना संपल्यानंतर फेब्रुवारी २०२२ला तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी यासाठी दहा कोटींची तरतूद केली. तरतूद करून माहिती संकलन करेपर्यंत राज्यात सत्तांतर झाले. नवीन सरकार आल्यानंतर पहिली यादी जाहीर केली, त्यानंतर पैसे जमा झाले. एकूणच गेली साडेतीन वर्षे ‘प्रोत्साहन’ अनुदानाचे नुसते गुऱ्हाळ सुरू आहे. कोठे तरी हा विषय तातडीने संपवून योजना बंद करण्याऐवजी पंचवार्षिक योजनेसारखे ही प्रक्रिया लोंबकळत ठेवण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा दिसत आहे.
तिसऱ्या यादीकडे डोळे
प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या दोन्हीही यादीत नाव नसलेल्या पात्र शेतकऱ्यांची घालमेल सुरू आहे. दुसऱ्या यादीचे पैसे आल्यानंतर तिसरी यादी येईल, असे सांगण्यात येते. या यादीकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.
दृष्टिक्षेपात ‘प्रोत्साहन’ची यादी :
यादी पात्र शेतकरी मिळालेले अनुदान
पहिली १ लाख २९ हजार ३१८ ४४० कोटी
दुसरी ५७ हजार ३१०