१३ कोटींचा निधी मिळविणारी राज्यातील दुसरी महापालिका
By admin | Published: April 25, 2015 12:40 AM2015-04-25T00:40:04+5:302015-04-25T00:44:23+5:30
मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक यांनी शुक्रवारी महासभेत दिली माहिती
कोल्हापूर : भांडवली मूल्यांवर कर आकारणी व स्थानिक संस्था कर (एलबीटी) यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात कोल्हापूर महानगरपालिका राज्यात अव्वल ठरली. त्यामुळे १३व्या वित्त आयोगातून राज्य शासनाकडून १३ कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी मिळविणारी नांदेडनंतर कोल्हापूर ही महापालिका ठरली. महापालिकेला एकूण २७ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीचे बक्षीस मिळाले, अशी माहिती मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक यांनी शुक्रवारी महासभेत दिली.
गेल्या पंधरा दिवसांत महापालिकेला १३व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत वेगवेगळे सात आदेश शासनाकडून आले आहेत. प्राप्त २७ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीपैकी १३ कोटी रुपयांचा निधी हा प्रोत्साहनपर आहे. राज्यात कोल्हापूर व नांदेड या दोन महापालिकांनाच तो मिळाला आहे. तो कशा प्रकारे खर्च करावा, याबाबत राज्य शासनाने नियमावली ठरवून दिली आहे. शहरातील विविध कारणांसाठी आरक्षित करावयाच्या जागांसाठी आवश्यक भूसंपादनासाठी सात कोटी रुपये, रस्त्यांसाठी १३ कोटी, तर उर्वरित निधी घनकचरा व्यवस्थापन, लॅँडफिल्ड साईड विकसित करणे, पाणीपुरवठा, आदी सुविधांवर खर्च करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)