राज्यात आणखी एक हजार डॉक्टर्स भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 12:34 PM2021-07-17T12:34:06+5:302021-07-17T12:35:34+5:30
CoronaVirus Hospital Kolhapur : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून येत्या दोन महिन्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून येत्या दोन महिन्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या टोपे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गट क आणि ड च्या दहा हजार जागा भरण्यात येणार असून ही प्रक्रिया ही दोन महिन्यात संपवण्यात येईल. आशा वर्कर्स ना महिलाना १५०० रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये २०५ कोटी रूपयांचा निधी राज्य आपत्कालीन निधीतून मंजूर करण्यात आला आहे. १५ वर्षांपूर्वीच्या १००० रूग्णवाहिका वापरातून काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५०० नवीन रूग्णवाहिका देण्यात आल्या असून उर्वरित ५०० रूग्णवाहिकांसाठी ७८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
तिसऱ्या लाटे आधी आरोग्य सुविधा तयार करण्यासाठी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये १२२२ कोटी रूपयांची मंजुरी घेण्यात आली असून निधीची अडचण भासणार नाही.
उद्योजकांचा कोल्हापूर पॅटर्न
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी स्वखर्चाने लस विकत घेऊन आपल्या कामगारांना लस दिली आहे. कोल्हापूरचा हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राने राबवण्याची गरज यावेळी राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न
तिसरी लाट आली तरी कामगारांचे लसीकरण करून, त्यांना कारखान्याच्या आवारातच निवासाची व्यवस्था करून उद्योग आणि कारखाने सुरू रहावेत यासाठी नियोजन सुरू आहे. आधीच थांबलेले अर्थचक्र पुन्हा थांबू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहेत असे टोपे यांनी सांगितले.