बेळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे आणखी एका मार्गाचे नामकरण, सीमावासियांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 04:06 PM2022-12-27T16:06:59+5:302022-12-27T16:09:04+5:30
'बेळगाव शहरातील रस्त्यांना नावे देऊन शहराचं कानडीकरण करण्याचा घाट'
प्रकाश बेळगोजी
बेळगाव: बेळगावमधील अनगोळ परिसरातील बेम्को हायड्रॉलिक्स ते चौथ्या रेल्वे गेटपर्यंतच्या मार्गाचे नाव बसवराज बोम्मई मार्ग असे करण्यात आले. आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या नामफलकाचे अनावरण पार पडले. के. एल. इ. संस्थेच्या डॉ. शेषगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांनी ‘बसवराज बोम्मई मार्ग’ या नामफलकाचे अनावरण केले.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या रस्त्याचे नामकरण करण्याबरोबरच डेकोरेटिव्ह पथदीपांचे उद्घाटनही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे नाव देऊन नामकरण करण्यात आलेला बेळगावमधील हा दुसरा मार्ग आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचेही नाव बेळगावमधील जुन्या पी बी रोड वरील रस्त्याला देण्यात आले आहे. जुने बेळगाव ते अलारवाड क्रॉस या रस्त्याला दहा वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा मार्ग असे नामकरण करण्यात आले होते. आता उद्यमबाग मधल्या या रस्त्याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नाव देण्यात आलेले आहे.
कर्नाटक सरकारच्या विविध लोकप्रतिनिधींची बेळगाव शहरातील रस्त्यांना नावे देऊन बेळगाव शहराचं कानडीकरण करण्याचा घाटच कर्नाटक सरकारने या निमित्ताने घातला आहे असा आरोप होऊ लागला आहे. मराठी माणसांची ओळख पुसणे आणि कानडी ओळख निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे अशी नाराजी सीमावासीय व्यक्त करत आहेत.