एका लग्नाची दुसरी गोष्ट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:14+5:302021-07-10T04:17:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : विवाह सोहळ्याला माणसाच्या जीवनात अविस्मरणीय मानले जाते. लग्नाच्या आठवणी आयुष्यभर सोबत ठेवण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
पोर्ले तर्फ ठाणे : विवाह सोहळ्याला माणसाच्या जीवनात अविस्मरणीय मानले जाते. लग्नाच्या आठवणी आयुष्यभर सोबत ठेवण्यासाठी माध्यमांचा वापर केला जातो. परिस्थितीमुळे आई-वडिलांच्या लग्नाची कोणतीही आठवण नसलेल्या मुलं आणि पुतण्यांनी चक्क त्यांच्या लग्न वाढदिवसादिवशी लग्नाची दुसऱ्यांदा खूणगाठ बांधून मित्र परिवाराने अविस्मरणीय क्षण अनुभवला. गड तालुक्यातील पायथ्याशी असणाऱ्या खासगी साखर कारखान्याच्या शेजारील गावात एका लग्नाच्या पन्नाशीतील दुसऱ्या गोष्टीचा विषय ऐकणाऱ्यांसाठी नवल वाटणार आहे.
पन्नाशीतील दाम्पत्याने पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या लग्नाच्या आठवणीतील क्षणाचा एकही पुरावा नसल्याची मनातील खंत मुलांना बोलून दाखवली होती. अठराविश्व दारिद्रय दूर होऊन अवतीभोवती सुखाच्या अनुभवास ती एक सल होती.
यादी पे शादीमुळे आईच्या गावी लग्न झाल्याने आता वडिलांच्या घरी अक्षता पाडायच्या म्हणून मुलांनी ७ जुलै रोजी लग्न वाढदिवसादिवशी आई-बाबांना पुनश्च लग्नाच्या बेडीत अडकून त्यांना उर्वरित आयुष्यासाठी सुखद क्षणाचा अनुभव देण्यासाठी नियोजन केले. मँचेस्टर सिटीतील जनतेशी नाळ असलेल्या बँकेत वडील कर्मचारी, तर आई गृहिणी आहे.
पालक आपल्या लग्नात राहून गेलेली हौस मुला-मुलींच्या लग्नात फेडून घेतात. हे सर्वश्रुत आहे.
येथे मात्र अनुभव वेगळा आला. आई-वडिलांच्या लग्नात मुले, पुतणे, सुना आणि नातवंडांचे मिरवणे त्यांच्यासाठी अविस्मरणीय होते. लग्नाचा वाढदिवस कसला! इथं उपस्थितांना लग्नाच्या मंडपातील लवाजमाचा अनुभव चाखायला मिळाला. यावेळी कोरोनाची भीती, समाजाच्या रीतिरिवाजांचा विचार केल्यामुळे लगीनघाईत बँडबाजा, वरात, वऱ्हाडं आणि भटजींची कमतरता दिसून येत होती. अक्षतासाठी ७ तारखेला सायंकाळी ७ वाजून ७ मिनिटाचा गोरज मुहूर्त काढला होता. मंडोळ्या बांधून मुलांनी धरलेल्या अंतरपाटावर दाम्पत्यांना उभे केले. मंगलाष्टकाबरोबर फुलांच्या अक्षता अंगावर पडू लागल्यावर पुनश्च लग्नाच्या अनुभवाने त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते. लग्नपत्रिकेपासून, हळदी, अक्षता आणि मेजवानीपर्यंतच्या विशेष वाटणाऱ्या प्रक्रिया गुपचूपणे घराच्या चार भिंती आत पार पाडल्या. समाजाच्या लाजेमुळे चार भिंतीच्या आत घडलेल्या आणि नवल वाटणाऱ्या लग्नाची चर्चा परिसरात कुतूहलतेचा विषय बनत आहे.