चिंताजनक! कोल्हापुरात आणखी तीघे ओमायक्रॉन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 07:59 PM2022-01-04T19:59:27+5:302022-01-05T11:09:15+5:30
शहरात ओमायक्रॉनचा धोका वाढला असून काल, मंगळवारी आणखी तीन नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
कोल्हापूर : शहरात ओमायक्रॉनचा धोका वाढला असून काल, मंगळवारी आणखी तीन नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. तातडीने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तीस नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी नागाळापार्क येथील एक व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेली त्यांची २७ वर्षीय मुलीचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल मंगळवारी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला. ही तरुणी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. विशेष म्हणजे या तरुणीसह तिच्या वडिलांनीही कोविडचे दोन डोस घेतले होते.
मंगळवारी साईक्स एक्स्टेशन व सुर्वेनगर येथील दोन व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे अहवाल मंगळवारी सायंकाळी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाले. साईक्स एक्स्टेशनमधील ४७ वर्षीय पुरुष व्यक्ती दि. २१ डिसेंबर रोजी जर्मनीहून निघून दुबई, नवी दिल्ली, पुणे, सातारा असा प्रवास करुन कोल्हापुरात आली आहे.
भारतात परतत असताना जर्मनी येथे तर भारतात आल्यानंतर नवी दिल्ली येथे दि. २२ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल निगेटिव्ह आले होते. या व्यक्तीने दोन डोस घेतले होते; परंतु कोल्हापुरात आल्यानंतर २५ डिसेंबरला त्यांना सौम्य ताप आला.
त्यामुळे २७ डिसेंबर रोजी पुन्हा चाचणी करण्यात आली तेव्हा त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या ३७ व्यक्तींची आरटीपीसीआर करण्यात आली तेव्हा त्यांच्या पत्नीही कोरोना बाधित असल्याचे दिसून आले.
सुर्वेनगरात ओमायक्रॉन
सुर्वे नगरातील ५७ वर्षीय पुरुषाचा अहवाल मंगळवारी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला. ही व्यक्ती २३ डिसेंबर रोजी अमेरिकेतून मुंबईत आणि तेथून कोल्हापुरात आली आहे. मुंबई विमानतळावर त्यांचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आला होता; मात्र कोल्हापुरात खासगी रुग्णालयात केलेल्या चाचणीनंतर त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.
प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर
शहरात तीन नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळून आल्याचे कळताच महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने तीन रुग्ण रहात असलेला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करुन त्या परिसरात औषध फवारणी करण्यात आली.