शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थी, पालकांना उडवाउडवीची उत्तरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 04:14 PM2020-08-20T16:14:06+5:302020-08-20T16:15:22+5:30
अकरावीसह सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही; त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थी, पालक हे माहिती विचारण्यासाठी गेले असता, त्यांना उद्धट, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशी तक्रार कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली.
कोल्हापूर : अकरावीसह सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही; त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थी, पालक हे माहिती विचारण्यासाठी गेले असता, त्यांना उद्धट, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, अशी तक्रार कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली.
विविध मागण्यांचे निवेदन कृती समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना दिले. शहरात सध्या इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये अर्ज करताना अनेक वेळा सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
ऑनलाईन प्रक्रिया चांगली असली, तरी त्यामध्ये त्रुटी असून त्या दूर कराव्यात. त्या प्रक्रियेबाबतचे काही मुद्दे कृती समितीने शिक्षण उपसंचालकांसमोर मांडले. यावेळी समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, संभाजी जगदाळे, अंजुम देसाई, विनोद डुणुंग, अनिल घाटगे, महादेव पाटील, राजेश वरक, भाऊ घोडके, परवेज सय्यद, समीर सय्यद उपस्थित होते.
कृती समितीने अकरावीच्या प्रक्रियेबाबत मांडलेले काही मुद्दे
१) काही महाविद्यालयांत वैयक्तीक अर्ज घेतले जातात.
२) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांना शुल्काची सक्ती करू नये.
३) खेळाडूंसाठी कोणत्या महाविद्यालयांत जागा राखीव ठेवल्या आहेत?
४) या प्रवेश प्रक्रियेत उत्पन्नाच्या अनुषंगाने काही जागा राखीव ठेवल्या आहेत का?
शुल्काची रक्कम कमी करण्याबाबत बैठक घेऊ
विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन शुल्क ५० टक्क्यांनी कमी करण्याबाबत शासनाला प्रस्ताव दिला जाईल, असे आश्वासन शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी दिले. खेळाडूंसह कोणताही प्रवेशापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल. ऑनलाईन प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या नोंदविण्यासाठी चार हेल्पलाईन उपलब्ध करून देणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.