टोलविरोधात ९ जूनला महामोर्चा
By admin | Published: May 15, 2014 12:54 AM2014-05-15T00:54:09+5:302014-05-15T01:03:30+5:30
कोल्हापूर : टोलविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ जून रोजी महामोर्चा काढण्याचा निर्णय आज, बुधवारी येथील शहाजी महाविद्यालयाच्या
कोल्हापूर : टोलविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ जून रोजी महामोर्चा काढण्याचा निर्णय आज, बुधवारी येथील शहाजी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला. महामोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्हाभर जागृती सभा व मेळावे घेण्याचे ठरले. कोणीही सवतासुभा न मांडता सर्वांनी एकत्र येऊन टोल आंदोलनाची धार वाढवूया, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले. सर्वाेच्च न्यायालयाने टोलची स्थगिती उठविण्यास संमती दर्शविल्याने कोणत्याही क्षणी टोल सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी दोनवेळा टोलविरोधात महामोर्चा काढून कोल्हापूरकरांनी आपला रोष व्यक्त केला आहे. या मेळाव्यामुळे टोलविरोधी आंदोलनाचे तिसरे पर्व सुरू झाले असून याची ठिणगी पडली आहे. महापौर सुनीता राऊत, उपमहापौर मोहन गोंजारे, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, दिलीप पवार, आदींसह मेळाव्यासाठी शिवसेनेव्यतिरिक्त सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. एन. डी. पाटील म्हणाले, सर्वांना आपल्या पक्षाची आर्थिक व सामाजिक धोरणे पक्की माहिती आहेत. म्हणूनच आपण सर्वजण वेगवेगळ्या राजकीय पक्षांत काम करीत आहोत. टोल हा कोल्हापूरकरांच्या अस्मितेवर घाला आहे. यामुळेच मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. टोल आंदोलनाचा जोश व दबाव आपण सर्वजण एकत्र आल्यानेच आहे. हा दबाव कमी होणे किंचितही परवडणारे नाही. एकमेकांच्या सामर्थ्याविषयी मतभेद व्यक्त करण्यापेक्षा राज्यकर्त्यांच्या कानांवर कोल्हापूरचा आवाज पोहोचविण्यासाठी एकत्र येऊया. ९ जूनपर्यंत शहरातील प्रत्येक पेठेत व तालमीत सभा घ्या, जिल्ह्णाच्या कानाकोपर्यात टोलविरोधी ज्योत पुन्हा पेटविण्यासाठी सज्ज व्हा. मेळाव्याचे सूत्रसंचालन गिरीश फोंडे यांनी, तर प्रास्ताविक कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी केले. यावेळी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, सत्यजित कदम, परीक्षित पन्हाळकर, आदिल फरास, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, रामभाऊ चव्हाण, चंद्रकांत बोंद्रे, बाबासाहेब पाटील भुयेकर उपस्थित होते. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर : एन. डी. पाटील कोणतीही किंमत मोजायला लागली तरी शेवटच्या श्वासापर्यंत टोल आंदोलनात सक्रिय राहणार आहे. सुचेल त्या मार्गाने टोलचा एकत्रित सामना करूया. लोकसभा निवडणुकीमुळे निर्माण झालेले राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाला टोल आंदोलनातून बाजूला होता येणार नाही. ताकदीपेक्षा डावपेचांची अधिक गरज असल्याने एकीचे बळ दाखवत राज्यकर्त्यांना झुकवूया, असे आवाहन एन. डी. पाटील यांनी केले. मंत्र्यांनी वेळ द्यावी टोलधाड घालविण्याची सर्वस्वी जबाबदारी कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आहे. महामोर्चापूर्वी टोल बंद करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. तत्पूर्वी कृती समितीशी बैठक घ्यावी, असे आवाहन निवास साळोखे यांनी केले. टोल म्हणजे विकृत राक्षस हाय ‘कोल्हापूरकर आज संकटात हाय... टोल म्हणजे... टोल म्हणजे... टोल म्हणजे... विकृत राक्षस हाय...’ ही कविता सादर करीत तेजस्विनी पांचाळ या विद्यार्र्थिनीने सर्वांचे लक्ष वेधले. मोर्चासाठी कोण काय करणार? महापौर सुनीता राऊत - सर्व नगरसेवकांसह दोन हजारांचा सहभाग नोंदविणार उपमहापौर मोहन गोंजारे- विक्रमनगर-टेंबलाईवाडी परिसरात सभा घेणार निवास साळोखे - मंगळवार पेठेतील कार्यकर्त्यांचा १८ मे रोजी मिरजकर तिकटीला मेळावा. आर. के पोवार - महाराणा प्रताप चौकात जागृती सभा लाला गायकवाड - साखर कामगारांचा सहभाग नोंदविणार सतीशचंद्र कांबळे- टोलविरोधात एक लाख पत्रके वाटणार दिलीप पवार- गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली १८ मे रोजी एस.टी. स्टॅँडवर मोठा मेळावा घेणार रघुनाथ पोरे - चर्मकार संघाच्या नेतृत्वाखाली चर्मकारांचा सहभाग नोंदविणार भूपाल शेटे - पंधरा फूट उंच कोल्हापुरी चपलांसह मोर्चात सहभाग बाबासाहेब देवकर - माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यात जागृती मेळावे घेणार. बाबा इंदुलकर - रिक्षा संघटनांच्या सहकार्याने दररोज दुपारी रॅली व १ जूनला राजारामपुरीत सभा भाऊ घोंघळे- लॉरी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली बैठका व वाहनधारकांचा सहभाग रामभाऊ चव्हाण - भाजपतर्फे गारगोटी, गडहिंग्लज, उचगाव परिसरात सभा घेणार अॅड. रमेश बद्दी - एमएसआरडीसी व आयआरबीवर फौजदारी करणार संदीप पाटील- मराठा महासंघाच्या माध्यमातून पाच हजारांशी संपर्क साधणार सुरेश गायकवाड- सराफ संघ व व्यापार्यांसह मोर्चात अग्रभागी चंद्रकांत यादव- ‘सिटू’च्या माध्यमातून कामगारांचा सहभाग नोंदविणार अॅड. विवेक घाटगे - बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्व वकिलांचा गणवेशात मोर्चात सहभाग सुभाष कोळी- राष्टÑीय नेत्यांची वेशभूषा करून शहरात जागृती सत्यजित कदम - मोर्चासाठी सर्र्वतोपरी मदत करणार अतुल दिघे - जिल्ह्णातील एमआयडीसीतील कामगारांत जागृती व सहभाग