वटपौर्णिमा पूजेवेळीही केली ॲन्टिजन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 06:54 PM2021-06-24T18:54:39+5:302021-06-24T18:56:39+5:30
Religious programme Kolhapur : अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी पतीची साथ मागत गुरुवारी सौभाग्यवतींनी वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या फांद्या पूजण्याऐवजी प्रत्यक्ष वडाच्या झाडाचे पूजन आणि वडाचे झाड लावून महिलांनी पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. दुसरीकडे या महिलांचे आरोग्याची काळजी घेत आरोग्य यंत्रणेने वडपूजनाच्या ठिकाणीच ॲन्टिजन तपासणी केली.
कोल्हापूर : अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी पतीची साथ मागत गुरुवारी सौभाग्यवतींनी वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या फांद्या पूजण्याऐवजी प्रत्यक्ष वडाच्या झाडाचे पूजन आणि वडाचे झाड लावून महिलांनी पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. दुसरीकडे या महिलांचे आरोग्याची काळजी घेत आरोग्य यंत्रणेने वडपूजनाच्या ठिकाणीच ॲन्टिजन तपासणी केली.
ज्या दिवशी वडाच्या झाडाखाली पतीचे गेलेले प्राण सावित्रीने परत आणले तो दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने महिलांना ऑक्सिजनचे स्रोत असलेल्या वडाच्या झाडाचा काही काळासाठी सहवास लाभतो. व्रतामागे असलेल्या पौराणिक कथेला पर्यावरणाशी जोडणाऱ्या या सणानिमित्त गुरुवारी विवाहीत महिलांनी वडाच्या झाडाचे पूजन केले.
सकाळपासूनच पारंपरिक काठापदराची साडी, साजश्रृंगार केलेल्या महिला भागातील वडाच्या झाडाच्या पूजनासाठी एकत्र जाताना दिसत होत्या. त्यामुळे शहरात चौकांमध्ये, रस्त्याकडेला असलेल्या वडाच्या झाडाभोवती सवासिनींची गर्दी दिसत होती. महिलांनी वडाच्या झाडाची आंबा, फणस, जांभूळ, केळी अशा फळांची ओटी भरून पूजा केली.
दोर बांधून सात फेऱ्या मारताना जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी कामना केली. गेल्या काही वर्षात या सणासाठी वडाच्या फांद्या तोडण्याचे प्रमाण वाढले होते, आता महिलांमध्येही पर्यावरणाविषयी जागृती झाल्याने घराजवळील वडाच्या झाडाचे पूजन करण्याला प्राधान्य देण्यात आले. अनेक जणींनी त्या पुढचे पाऊल टाकत वडाचे झाड लवून हा दिवस साजरा केला.
सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हा प्रशासनाने चाचण्यांची संख्याही वाढवली आहे, दिसेल तिथे ॲन्टिजन चाचणी केली जात आहे, याला वटपौर्णिमादेखील अपवाद राहिली नाही. महिलांची गर्दी होते त्याठिकाणी आरोग्य यंत्रणेकडून ॲन्टिजन टेस्ट केली जात होती.