वटपौर्णिमा पूजेवेळीही केली ॲन्टिजन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:35+5:302021-06-25T04:17:35+5:30

कोल्हापूर : अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी पतीची साथ मागत गुरुवारी सौभाग्यवतींनी वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या फांद्या पूजण्याऐवजी प्रत्यक्ष वडाच्या ...

Antigen test also performed during Vatpoornima Puja | वटपौर्णिमा पूजेवेळीही केली ॲन्टिजन चाचणी

वटपौर्णिमा पूजेवेळीही केली ॲन्टिजन चाचणी

Next

कोल्हापूर : अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी पतीची साथ मागत गुरुवारी सौभाग्यवतींनी वटपौर्णिमा साजरी केली. वडाच्या फांद्या पूजण्याऐवजी प्रत्यक्ष वडाच्या झाडाचे पूजन आणि वडाचे झाड लावून महिलांनी पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. दुसरीकडे या महिलांचे आरोग्याची काळजी घेत आरोग्य यंत्रणेने वडपूजनाच्या ठिकाणीच ॲन्टिजन तपासणी केली.

ज्या दिवशी वडाच्या झाडाखाली पतीचे गेलेले प्राण सावित्रीने परत आणले तो दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने महिलांना ऑक्सिजनचे स्रोत असलेल्या वडाच्या झाडाचा काही काळासाठी सहवास लाभतो. व्रतामागे असलेल्या पौराणिक कथेला पर्यावरणाशी जोडणाऱ्या या सणानिमित्त गुरुवारी विवाहीत महिलांनी वडाच्या झाडाचे पूजन केले. सकाळपासूनच पारंपरिक काठापदराची साडी, साजश्रृंगार केलेल्या महिला भागातील वडाच्या झाडाच्या पूजनासाठी एकत्र जाताना दिसत होत्या. त्यामुळे शहरात चौकांमध्ये, रस्त्याकडेला असलेल्या वडाच्या झाडाभोवती सवासिनींची गर्दी दिसत होती. महिलांनी वडाच्या झाडाची आंबा, फणस, जांभूळ, केळी अशा फळांची ओटी भरून पूजा केली. दोर बांधून सात फेऱ्या मारताना जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी कामना केली. गेल्या काही वर्षात या सणासाठी वडाच्या फांद्या तोडण्याचे प्रमाण वाढले होते, आता महिलांमध्येही पर्यावरणाविषयी जागृती झाल्याने घराजवळील वडाच्या झाडाचे पूजन करण्याला प्राधान्य देण्यात आले. अनेक जणींनी त्या पुढचे पाऊल टाकत वडाचे झाड लवून हा दिवस साजरा केला.

सध्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हा प्रशासनाने चाचण्यांची संख्याही वाढवली आहे, दिसेल तिथे ॲन्टिजन चाचणी केली जात आहे, याला वटपौर्णिमादेखील अपवाद राहिली नाही. महिलांची गर्दी होते त्याठिकाणी आरोग्य यंत्रणेकडून ॲन्टिजन टेस्ट केली जात होती.

--

फोटो नं २४०६२०२१-कोल-वटपौर्णिमा०१

ओेळ : अखंड सौभाग्य आणि जन्मोजन्मी पतीची साथ मिळावी अशी कामना करत गुरुवारी कोल्हापुरातील सवासिनींनी निसर्गाच्या सान्निध्यात वटपौर्णिमा साजरी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--

आज बेंदूर

वटपौर्णिमेनंतर आज शुक्रवारी कर्नाटकी बेंदूर हा सण साजरा होत आहे. कृषिप्रधान संस्कृतीचे प्रतीक आणि शेतकऱ्याचा सखा असलेल्या मूक प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या सणाला बैलांना न्हाऊ, माखू घालून त्यांचे औक्षण केले जाते. घरोघरी पुरणपोळीचा बेत केला जातो. यानिमित्त शहरात ठिकठिकाणी मातीचे बैल विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

--

--

Web Title: Antigen test also performed during Vatpoornima Puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.