खासगी बसमधील प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:19+5:302021-04-23T04:26:19+5:30
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गामुळे खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आता ॲन्टिजेन चाचणी करण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर ...
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गामुळे खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आता ॲन्टिजेन चाचणी करण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर १४ दिवस गृह विलगीकरणाचे शिक्के मारण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी परिवहन महामंडळ व खासगी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सुचवले.
राज्य शासनाने प्रवासावर घातलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार अर्चना कापसे, रंजना बिचकर यांच्यासह खासगी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या बसेससाठी तालुकास्तरावर ठिकाणे निश्चित करा. या प्रवाशांची ॲन्टिजेन टेस्ट करून त्यांच्या हातावर १४ दिवस गृह विलगीकरणाचे शिक्के मारावेत. शक्यतो प्रवास सुरू करण्यापूर्वीच प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करावी. खासगी प्रयोगशाळेच्या मदतीने या चाचण्या वाहतूक संस्थेने कराव्यात. परिवहन मंडळानेही याबाबत नियोजन करावे. रेल्वेमधून येणाऱ्या प्रवाशांसाठीही रेल्वेप्रबंधक यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने नियोजन करावे. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभागाने ठिकाणे निश्चित करावीत. तसेच शासनाने प्रवासावर घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही ते म्हणाले.
--
फोटो नं २२०४२०२१-कोल-कलेक्टर बैठक
ओेळ : जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी खासगी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.
--