शिये येथे व्यावसायिकांची अँटिजन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:47+5:302021-04-24T04:24:47+5:30
शिये : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिये येथील लोकांच्या संपर्कात येणाऱ्या ६३ दुकानदारांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यामधील तिघांचे ...
शिये : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिये येथील लोकांच्या संपर्कात येणाऱ्या ६३ दुकानदारांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यामधील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथील कोरोनाबाधितांची संख्या १६ झाली आहे. दरम्यान, कोणतीही लक्षणे नसताना शुक्रवारी आणखी तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने विनाकारण लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरपंच रेखा जाधव यांनी केले आहे.
कोरोनाचे संकट वाढत असल्याने राज्य शासनाच्या वतीने संचारबंदी लागू केली आहे. या काळातही काही व्यावसायिक मास्कचा वापर करत नाहीत. किराणा माल, दूध डेअरी, सोसायटी कर्मचारी, भाजीपाला विकणारे हे लोकांच्या थेट संपर्कात येत असून कोणतीही लक्षणे नसणारे अनेक लोक कोरोनाबाधित असल्याने समूह संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. अँटिजन टेस्ट न करता व्यवसाय चालू ठेवल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.