महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने पटकावली 3 पदके
By विश्वास पाटील | Published: November 8, 2022 05:09 PM2022-11-08T17:09:16+5:302022-11-08T17:09:44+5:30
या स्पर्धेत ३५० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते
कोल्हापूर : ३७ व्या महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने ३ पदकांवर आपली मोहोर उमटवली. १ ते ६ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान मुंबई येथे या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पुणे, नागपूर, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, जालना अशा विविध भागांमधून ३५० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते.
अनुष्काने दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ६०० पैकी ५६७ गुण मिळवत कॉलिफिकेशन राऊंडमध्ये ज्युनिअर गटात अव्वल स्थान प्राप्त केले. या स्पर्धकांमधून टॉप ८ नेमबाज खेळाडूंची निवड अंतिम फेरीत झाली. यामध्ये अनुष्काने ज्युनियर व सीनियर या दोन्ही गटांमध्ये कास्यपदक पदक मिळविले. ५० मीटर फ्री पिस्तल गटात ५०९ गुण मिळवत ज्युनिअर गटात रौप्य पदक मिळविले.
अनुष्का गोखले कॉलेज येथे बीएस्सी कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत असून तिला संस्थेचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, मंजिरी मोरे देसाई , उपाध्यक्ष सावंत, प्राचार्य भुयेकर, क्रीडाशिक्षक कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले. अनुष्का पुणे क्रीडा प्रबोधिनीची अनिवासी खेळाडू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य सुहास पाटील, ऑलम्पिक खेळाडू गगन नारंग, प्रशिक्षक सी.के.चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.