LokSabha2024: कुणी केला ‘घात’, कुणी दिला ‘हात’; कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेही ‘गॅस’वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 06:44 PM2024-06-03T18:44:05+5:302024-06-03T18:44:22+5:30

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलून टाकणाऱ्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या मंगळवारी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमका ...

anxiety among leaders of Kolhapur district over the role of activists in the Lok Sabha elections | LokSabha2024: कुणी केला ‘घात’, कुणी दिला ‘हात’; कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेही ‘गॅस’वर

LokSabha2024: कुणी केला ‘घात’, कुणी दिला ‘हात’; कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नेतेही ‘गॅस’वर

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलून टाकणाऱ्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या मंगळवारी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमका ‘घात’ कुणी केला आणि नेमका ‘हात’कुणी दिला हे लखलखीतपणे स्पष्ट होणार आहे. आपलेच कार्यकर्ते यंदा म्हणावे तसे आपल्यासोबत नव्हते याचा अंदाज आलेले नेतेही ‘गॅस’वर असून या निवडणुकीत त्यांचा प्रभाव किती टक्के चालला हे देखील या निकालाने उघडकीस येणार आहे. याचे पडसाद येणाऱ्या विधानसभेवेळी उमटणे अपरिहार्य आहे.

या लोकसभेत सत्तारूढ महायुती विरोधात सत्तेबाहेर असलेली महाविकास आघाडी अशी लढत रंगली. परंतु महायुतीला हा सामना जेवढा सोपा वाटला होता तेवढा तो झाला नाही हे आता समोर येत आहे. कोल्हापूर जिल्हाही याला अपवाद राहिला नाही. महाविकास आघाडीने कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू छत्रपतींचे जे खणखणीत नाणं काढलं त्यामुळं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना दत्तक प्रकरणाचा आधार घ्यावा लागला. शाहू छत्रपती यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला आणि तुलनेत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालची त्यांची एकूणच यंत्रणा एक संघपणे कामाला लागल्याचे दिसून आले. याउलट मंडलिक यांना मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी अधिक वेळ देऊन, त्यांचे ऐकून घेऊन मग आपले सांगावे लागले.

हीच परिस्थितीत हातकणंगले मतदारसंघात झाली. तिथे राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेऊन आघाडीची पंचाईत केली आणि इरेला पेटलेल्या उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील सरूडकरांसारखा हुकमी एक्का काढला. त्यामुळे धैर्यशील माने यांची आधीच सुरू झालेली डोकेदुखी आणखी वाढली. या परिस्थितीचा परिणाम असा झाला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरात अनेक मुक्काम करून जोडण्या लावाव्या लागल्या. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही तोंडाला महाविकास आघाडीशी प्रचारात सामना करताना फेस आला ही वस्तुस्थिती आहे. अशातच एकमेकांचा शेलक्या शब्दात उद्धार करणारी मंडळी एकत्र येऊन मते मागत असताना नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचीही कोंडी झाली. जनतेला तर हे अजिबात आवडले नाही. त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात दिसून येणार आहे.

साहेब तुमच्या निवडणुकीला मी हायच

अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांनी यावेळी ‘साहेब मी तुमच्या निवडणुकीला रात्रंदिवस तुमच्यासोबत हाय. पण आत्ता लई काय सांगू नका’ अशी जाहीर भूमिका घेतल्याने या नेत्यांची गोची झाली आहे. आता त्याला जास्त ताणावं तर विधानसभेलाही तो उलट जाणार. त्यापेक्षा ‘जरा शांतपणानं घे, लई पुढं पुढं करू नकोस, माझी अडचण समजून घे’ अशी नरमाईची भूमिकाही काही मतदारसंघात घ्यावी लागली आहे.

लाभाला इकडं, लोकसभेला तिकडं

गेली पावणे दोन वर्षे राज्यात महायुती सत्तेवर आहे. त्यांच्याकडून लाभ घेण्यासाठी असलेल्या अनेकांनी या निवडणुकीत आपल्या सोयीची भूमिका घेतली आहे. अगदी राजकीय पदाधिकाऱ्यांपासून ते ठेकेदारापर्यंत अनेकांनी अशीच भूमिका घेतली आहे. तसेच नेत्यांनीही येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आपल्या भूमिका ठरवल्या आहेत. अगदीच काही अंगलट आलं तर ‘लोकं ऐकण्याच्या पलीकडं गेलेली ओ’असं सांगण्याचा पर्याय नेत्यांनी निवडला आहे.

Web Title: anxiety among leaders of Kolhapur district over the role of activists in the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.