पोलीस प्रशासनाकडून चिंता : अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:30 AM2020-02-03T10:30:41+5:302020-02-03T10:32:50+5:30
ही चिंतेची बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शालेय स्तरावर मुला-मुलींमध्ये प्रबोधन करण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, महिला दक्षता विभाग, बालकल्याण समिती यांच्यावतीने मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
एकनाथ पाटील
कोल्हापूर : टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे १६ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुली घर सोडून प्रियकरासोबत पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात १०० पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींनी घर सोडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, चंदगड, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले, गडहिंग्लज, आदी तालुक्यांत मुलींचे घर सोडून निघून जाण्याचे प्रमाण घाबरवून टाकणारे आहे.
ही चिंतेची बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शालेय स्तरावर मुला-मुलींमध्ये प्रबोधन करण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, महिला दक्षता विभाग, बालकल्याण समिती यांच्यावतीने मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी अल्पवयीन मुली पळून जाण्याची चिंता व्यक्त करीत शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत मुला-मुलींना प्रबोधनाचे धडे दिले जाणार आहेत.
शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड हा परिसर दुर्गम आहे. येथील बहुतांशी लोक नोकरीनिमित्त मुंबईला आहेत. त्यांचे कुटुंब मात्र गावातच आहे. आई कामासाठी बाहेर पडल्यानंतर अंकुश ठेवणारी जबाबदार व्यक्तीच घरी नसल्याने अल्पवयीन मुली निरनिराळ्या आमिषांना बळी पडत आहेत. आधी मैत्री, मग गप्पाटप्पा आणि मग भेटवस्तू. घरामध्ये न मिळणाऱ्या वस्तू प्रियकराकडून मिळू लागल्याने त्या भारावून जातात. मोबाईल अनेक मुलींना पुरविला जात आहे. हा प्रवास मैत्रीकडून तकलादू आणि दिखाऊ प्रेमसंबंधांपर्यंत जातो. त्यामुळे घरच्या बंधनातून बाहेर पडून स्वत:च्या स्वप्नातील संसार उभा करण्याचे स्वप्न या मुलींना पडते.
पंधरा-सोळा वर्षे हाताखांद्यावर खेळवले, वाढविले त्या आई-वडिलांपेक्षा त्यांना समोरचा प्रियकर महत्त्वाचा वाटू लागतो. आणि त्यातूनच त्या पळून जातात. काम आणि कमाईच्या चक्रात अडकलेले आई-वडील मुलींनी दिलेल्या या अनपेक्षित धक्क्याने कोलमडून जात असल्याचे चित्र आहे. आई-वडील पोलिसांत दाद मागतात. परंतु अब्रूचे खोबरे होणे आणि मन:स्ताप पदरी पडणे ते रोखू शकत नाहीत. अल्पवयीन मुलगी असल्याने पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. शोध घेतल्यानंतर मात्र मुलगीच स्वत:हून पळून गेल्याचे सांगते. हा पळून जाण्याचा ट्रेंड कोठेतरी थांबला पाहिजे. त्यासाठी शालेय स्तरावर मुला-मुलींच्यात प्रबोधन करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
कुटुंबाला मनस्ताप
पळून गेलेल्या मुलींच्या आयुष्यासह कुटुंबाचेही आयुष्य बरबाद होत असल्याची विदारक वस्तुस्थिती आहे. मुलगीचे अपहरण झाल्याची नोंद पोलीसदप्तरी झाल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याने तिने घरातून पळून जाऊन केलेला विवाह बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे मुलीची रवानगी सुधारगृहात आणि मुलावर कायदेशीर कारवाई होते. यात दोन्हीकडच्या कुटुंबांना प्रचंड मन:स्ताप भोगावा लागतो. विशेष म्हणजे केवळ मुली हरवल्या एवढ्यावरच ही समस्या संपणारी नाही.
अल्पवयीन मुली लग्नाच्या आमिषाने पळून जाण्याचे प्रमाण वाढते आहे. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन शालेय स्तरावर मुला-मुलींमध्ये प्रबोधन व समुपदेशन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनस्तरावर घेतला जात आहे.
डॉ. अभिनव देशमुख : पोलीस अधीक्षक, कोल्हापूर