आप्पाचीवाडी पहिली भाकणूकः चीन भारतावर हल्ला करेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 04:31 PM2019-10-18T16:31:23+5:302019-10-18T16:34:03+5:30
कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठे भगदाड पडून कर्नाटकातील चौथाई भाग ओसाड पडेल, असा धोक्याचा इशारा देतानाच जाती-धर्म बिघडून जाईल, वैरत्व वाढेल, हाणामाऱ्या होतील, चीन राष्ट्र भारतावर हल्ला करेल, असे भाकीत आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेत करण्यात आले
दत्ता पाटील
म्हाकवे : कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठे भगदाड पडून कर्नाटकातील चौथाई भाग ओसाड पडेल, असा धोक्याचा इशारा देतानाच जाती-धर्म बिघडून जाईल, वैरत्व वाढेल, हाणामाऱ्या होतील, चीन राष्ट्र भारतावर हल्ला करेल, भगवा झेंडा डवलाने मिरवेल, असे भाकीत आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेत करण्यात आले
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता. चिकोडी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाची भौम यात्रा गेल्या मंगळवारपासून सुरू आहे. शुक्रवारी पहाटेच्या निरव शांततेत नाथांची पहिली भाकणूक संपन्न झाली. नाथांचे भक्त भगवान ढोणे-वाघापूरे यांच्या मुखातून ही भाकणूक कथन झाली.
यावेळी सीमाभागातील हजारो भाविक उपस्थित होते, या भाकणूकीबाबत भक्तांमध्ये उत्सुकता असते, भगवा झेंडा डवलाने मिरवेल, तर इतर पक्ष चिंतेत राहतील. राजकारणात उलथा-पालथी होत राहतील. भाविकांनी सांभाळून राहावे, माझं माझं म्हणत बसू नका, असा मौलिक सल्लाही दिला.
या यात्रेसाठी कागल,निपाणी, संकेश्वर, रायबाग, मुरगुड, चिक्कोडी येथून जादा बसगाड्यांची सोय करण्यात आली. शनिवारी पहाटे नाथांची दुसरी भाकणूक होणार असून सकाळी ८ वा. घुमट मंदिरातही नाथांची भाकणूक होणार आहे. तर, सायंकाळी ४.३० वा.पालखी प्रदक्षिणा व बागेवाडी येथिल मानकऱ्यांच्या हस्ते कर तोडून यात्रेची सांगता होणार आहे.
नैतिकतेबरोबरच ऋतुचक्र बदलेल...
संतांच्या पावन भुमीत पापाचा घडा भरत चाललाय. भाऊ-बहिणीत प्रेमप्रकरणे होतील, ते लग्न करून घेतील. या नात्याला कलंक लागेल. तुम्ही सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहाल. लुगडी, घोंगडी, कपडे फुकट मिळतील, ऋतूचक्र बदलत जावून पीक पध्दतच बदलत जाईल, दीड महिना कालावधीचे धान्य पिकेल, दुध उत्पादक शेतकरी कर्जात राहिल तर मँनेजर मलई खात राहील.
पाकिस्तानच्या चौथाई भागावर ताबा मिळेल...
मराठा सैनिक मरणाला घाबरणार नाहीत. ते छातीची ढाल करून पाकिस्तानी सैन्याशी लढत राहतील. या लढाईत ते यशस्वी होवून पाकिस्तानचा चौथाई भाग भारताच्या ताब्यात घेतील. जम्मू काश्मीरमध्ये भारत मातेचा जयजयकार होईल, असे भाकितही करण्यात आले.
आप्पाचीवाडी येथिल श्री हालसिध्दनाथ देवाच्या यात्रेत पहाटेच्या निरव शांततेत भाकणूक कथन करताना भगवान ढोणे-वाघापूरे. यावेळी यावेळी सीमाभागातील हजारो भाविक उपस्थित होते. (छाया-मंगेश फोटो, आप्पाचीवाडी)