अपार्टमेंट, सोसायटीमधील फ्लॅटधारकांसाठी ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 02:07 PM2019-11-09T14:07:39+5:302019-11-09T14:12:08+5:30
राज्य शासनाने केलेल्या नवीन नियमावलीमुळे अनेक वर्षे रखडलेली अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट नावावर करण्याची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स अँड रेसिडेंट्स फॉर लिगल राईट्स प्रोटेक्शन फोर्ट व सुविधा सेवा केंद्राच्या मदतीने शासनाच्या या योजनेचा सहज व सुलभ लाभ घेता येत आहे. अनेक वर्षे फ्लॅट नावावर झाला नसलेल्यांना हे फायदेशीर ठरत आहे.
कोल्हापूर : राज्य शासनाने केलेल्या नवीन नियमावलीमुळे अनेक वर्षे रखडलेली अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट नावावर करण्याची संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स अँड रेसिडेंट्स फॉर लिगल राईट्स प्रोटेक्शन फोर्ट व सुविधा सेवा केंद्राच्या मदतीने शासनाच्या या योजनेचा सहज व सुलभ लाभ घेता येत आहे. अनेक वर्षे फ्लॅट नावावर झाला नसलेल्यांना हे फायदेशीर ठरत आहे.
अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेल्या अनेकांच्या नावे मिळकतीची नोंद झालेली नाही. अशा मिळकतींचे खरेदीपत्र झाले नसल्यामुळे मिळकतधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गरजेवेळी फ्लॅटवर कर्ज काढता येत नाही. या संदर्भात मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले.
अखेर राज्य शासनाने २८ आॅगस्ट २०१९ रोजी फ्लॅट आणि जागेची नोंदणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार करण्यासाठी होणाऱ्या नव्या कायद्यानुसार इमारतीची जागा हस्तांतरण करण्याच्या धोरणात बदल केले. यामुळे आवश्यकतेनुसार मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) जमा करून फ्लॅट नावावर करणे शक्य झाले.
अनेकांना मात्र, शासनाच्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे माहीत नाही. मुंबईमध्ये अनेक अपार्टमेंट आणि सोसायटीमधील फ्लॅट संबंधितांच्या नावे झालेले नाहीत. महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स रेसिडेंट्स युनिट फॉल लीगल राईट्स प्रोटेक्शन फोर्ट व सुविधा सेवा केंद्राने संबंधितांची सोयीसाठी विशेष मोहीमच सुरू केली आहे. यामध्ये संबंधितांना तांत्रिक साहाय्य, अर्धवट प्रकरणे पूर्ण करणे यांसह आवश्यक माहिती संकलनासाठी सहकार्य केले जात आहे.
मुंबईमध्ये २८ हजारांपेक्षा जास्त हौसिंग सोसायटी आहेत. त्यापैकी २५ टक्के मिळकतधारकांचे फ्लॅट नावावर नाहीत. पुण्यामध्येही हीच स्थिती आहे. कोल्हापुरात हौसिंग सोसायटीमधील फ्लॅट नावावर आहेत. मात्र, १०० पेक्षा जास्त अपार्टमेंटमधील फ्लॅट संबंधितांच्या नावावर नाहीत, हे वास्तव आहे. राज्य शासनाच्या नवीन योजनेमुळे केवळ स्टँप ड्यूटी जमा करून फ्लॅट नावावर करता येणार आहे. शासनाने चांगली योजना आणली आहे. कोल्हापुरातील संबंधितांना योजनेची अधिक माहिती पाहिजे असल्यास सहकार्य केले जाईल.
- व्ही. बी. पाटील,
अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन