इचलकरंजीत पोलीस लाईनमधील अपार्टमेंटची दुरुस्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:26 AM2021-09-03T04:26:09+5:302021-09-03T04:26:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील थोरात चौक परिसरात, तसेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील पोलीस लाईनमधील अपार्टमेंटची दुरवस्था झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील थोरात चौक परिसरात, तसेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील पोलीस लाईनमधील अपार्टमेंटची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी अनेक सोयी-सुविधांचा अभाव निर्माण झाला असून, पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या अपार्टमेंटची दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन माणुसकी फाउंडेशनने प्रांत कार्यालयात दिले.
निवेदनात, पोलीस समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. मात्र, त्यांच्या निवासस्थानांची दयनीय अवस्था झाली आहे. अपार्टमेंटमधील पाण्याची टाकी व नळांना गळती लागली आहे. त्यामुळे अनेक घरांमधून पाणी पाझरत जाते. खोल्यांचे दरवाजे व खिडक्या खराब झाल्या आहेत. फरशा फुटलेल्या आहेत. इमारती काळवंडलेल्या आहेत. परिसरात डबक्यात पाणी साचून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुण्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात. लाईन परिसरातील मैदानामध्ये जीमची सुविधा व कार्यक्रमासाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध करून द्यावा, अन्यथा फाउंडेशनच्यावतीने आंदोलन केले जाईल, असे म्हटले आहे.