'एक गाव एक गणपती' उपक्रमाबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात उदासीनता, किती गावांचा सहभाग.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 07:02 PM2024-09-10T19:02:18+5:302024-09-10T19:03:26+5:30

कोल्हापूर : गणेशोत्सव सर्वसमावेशक आणि विधायक व्हावा, यासाठी राज्य सरकारने एक गाव एक गणपती उपक्रमाला पाठबळ दिले होते. तंटामुक्त ...

Apathy in Kolhapur district about Ek Gaon Ek Ganapati initiative | 'एक गाव एक गणपती' उपक्रमाबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात उदासीनता, किती गावांचा सहभाग.. वाचा

'एक गाव एक गणपती' उपक्रमाबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात उदासीनता, किती गावांचा सहभाग.. वाचा

कोल्हापूर : गणेशोत्सव सर्वसमावेशक आणि विधायक व्हावा, यासाठी राज्य सरकारने एक गाव एक गणपती उपक्रमाला पाठबळ दिले होते. तंटामुक्त गाव अभियानाशी हा उपक्रम जोडल्यामुळे १० ते १५ वर्षांपूर्वी अनेक गावांनी यात सहभाग घेऊन आदर्श निर्माण केला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या योजनेबद्दल शासन आणि गावांचीही उदासीनता वाढलेली दिसत आहे. त्यामुळे एक गाव एक गणपती उपक्रमात सहभागी होणाऱ्या गावांची संख्या घटत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात २९१ गावांत एक गणपती होता, यंदा २८९ गावांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.

जिल्ह्यात २८९ गावांत ‘एक गाव एक गणपती’

जिल्ह्यातील २८९ गावांनी यंदा एक गाव एक गणपती उपक्रमात सहभाग घेतला आहे. राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यांतील गावांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद आहे. विशेषत: लहान गावांनी हा उपक्रम टिकवल्याचे दिसत आहे.

प्रतिसाद घटला

गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमाला गावांचा प्रतिसाद कमी होत आहे. गेल्या वर्षी २९१ गावांनी सहभाग घेतला होता. यंदा दोन गावांची घट झाली. कोल्हापूरसह राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही स्थिती दिसत आहे. शासनाची उदासीनता कायम राहिल्यास ही योजना येणाऱ्या काळात कालबाह्य होण्याचा धोका आहे.

मंडळांना राजकीय पाठबळ

गावात मंडळे वाढण्यासाठी राजकीय पाठबळ हे महत्त्वाचे कारण ठरत आहे. मतांचा गट तयार करण्यासाठी स्थानिक नेते तरुणांना मंडळ तयार करण्यासाठी पाठबळ देतात. स्थानिक संस्था, सत्ता केंद्रे यामुळेही मंडळांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

एकोपा वाढण्यास मदत

एक गाव एक गणपती उपक्रमाने गावांचा एकोपा वाढवला. मंडळांमधील संघर्ष, स्पर्धा कमी केली. उत्सवाच्या नावावर होणारा अनावश्यक खर्च कमी केला. गावातील विधायक कामांना प्रोत्साहन दिले. यामुळे हा उपक्रम यापुढेही गरजेचा आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात एक गाव एक गणपती उपक्रमात गावांचा सहभाग चांगला आहे. हा सहभाग वाढत राहावा यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असतात. - रवींद्र कळमकर - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

Web Title: Apathy in Kolhapur district about Ek Gaon Ek Ganapati initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.