वरणगे पाडळीतील संस्थेत अपहार
By admin | Published: June 18, 2014 12:56 AM2014-06-18T00:56:29+5:302014-06-18T00:58:41+5:30
दहा लाख हडपले : लिपिकासह चौघांना अटक; तीन दिवसांची कोठडी
कोल्हापूर : वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील श्री हनुमान विविध कार्यकारी सहकारी (विकास) संस्थेत ठेवीदारांच्या पैशांचा दुरूपयोग करून सुमारे १० लाखांचा अपहार केल्याच्या संशयावरून संस्थेतील दोन लिपिक, कॅशियर व शिपाई अशा चौघांना आज, मंगळवारी करवीर पोलिसांनी अटक केली. या सर्वांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, वरणगे-पाडळी येथे श्री हनुमान विविध कार्यकारी-सहकारी (विकास) संस्थेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. सभासदांचे उसाचे बिलही याठिकाणी जमा होत असते. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीमध्ये लिपिक दिलीप पाटील, युवराज पाटील, कॅशियर दत्तात्रय पाटील, शिपाई हरी पाटील यांनी सभासदांच्या नावावर जमा होणारे पैसे रजिस्टरला न दाखविता ते संगनमताने एकमेकाला वाटून घेऊन अपहार केल्याचे लेखापरीक्षक मनोज रमेश बागे (रा. आर. के. नगर) यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार संस्थाचालकांच्या कानावर घातला. त्यानंतर कारवाईच्या भीतीने त्यांनी ७ लाख रुपये परत संस्थेच्या नावावर जमा केले. उर्वरित रक्कम त्यांनी देण्यास टाळाटाळ केल्याने बागे यांनी चौघांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आज सकाळी सर्व संशयित आरोपींना घरातून अटक केली. (प्रतिनिधी)