‘अवनी’च्या बारशाला आपुलकीचा पाळणा
By Admin | Published: December 16, 2015 12:05 AM2015-12-16T00:05:03+5:302015-12-16T00:14:02+5:30
निराधार मुलगी : समाजाचा आधार मिळाला; मोठ्या उत्साहात बारसे
कोल्हापूर : आजच्या युगात जो-तो पैशाच्या मागे धावत आहे. मात्र, या युगातही माणुसकी जिवंत आहे, याचा प्रत्यय मंगळवारी सायंकाळी आला. भवानी मंडपात उघड्यावरच अर्चना सुरेश आडी या महिलेची प्रसूती होऊन तिला मुलगी झाली होती. मुलीला ‘अवनि’ संस्थेने दत्तक घेऊन मोठ्या थाटामाटात तिचे बारसेही घालण्यात आले. महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते त्या बाळाचे ‘अवनी’ असे नामकरणही करण्यात आले. मंगळवारी शाहूपुरी येथील ‘एकटी’ या रात्रनिवारा संस्थेत या बाळाच्या नामकरण सोहळा झाला. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. बारशासाठी शिंगोशी मार्केट येथील फूलविक्रेत्यांनी पाळणा सजविण्यासाठी फुले दिली होती. कचरावेचक महिलांनी बाळासाठी वाळा, तोडे, पैंजण आणले होते. हाफिज आरिफ व दशीर गवंडी यांनी धान्य दिले. उद्योजक अनिल खोत यांनी साखर दिली. माळकर स्वीटस्तर्फे जिलेबी देण्यात आली. सार्थक क्रिएशनचे संस्थापक सागर बगाडे व पत्नी सरिता बगाडे यांनी ‘अवनी’ एक वर्षाची होईपर्यंत तिच्या संगोपनाच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली. याप्रसंगी अरुंधती महाडिक, उपमहापौर शमा मुल्ला, डॉ. संदीप पाटील, दीपकुॅँवर माने, अनुराधा पाटील, संजय पाटील, अनुराधा भोसले, स्कॉट व ज्योलेंडा हे विदेशी पाहुणे उपस्थित होते.