जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडून दिलगिरी, मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले नसल्याचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:56 AM2023-09-06T11:56:16+5:302023-09-06T11:56:38+5:30
मंत्र्यांसोबत झालेल्या गोपनीय बैठकीतील चर्चेविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्यास राज्यात दंगली होतील किंवा मराठा समाजाला आरक्षण दिल्यास जाळपोळ होईल, असे मत व्यक्त केल्याचे वृत्त माध्यमातून प्रकाशित झाले होते. त्यावर अशी कोणतीही बाब बैठकीत घडली नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्वत: दिले होते.
या मुद्यावर सोमवारी त्यांनी पुन्हा स्पष्टीकरण देत आपण कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसल्याचा खुलासा केला आहे. कुणालाही कधीही जाणीवपूर्वक दुखावण्याचा आपला हेतू कधीच नसतो. मंत्र्यांसोबत झालेल्या गोपनीय बैठकीतील चर्चेविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे रेखावार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्या बैठकीत आपल्या कोणत्याही वक्तव्याद्वारे जर कुणीही दुखावले गेले असेल, तर आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणावरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली करण्याची मागणी केली होती, तसेच याप्रकरणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी रेखावार याबाबत खुलासा करतील, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते.