Kolhapur: महिला सुरक्षेसाठी माणगाव ग्रामपंचायतीने तयार केले अॅप; कसं होणार संरक्षण, सुविधा काय..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 04:19 PM2024-09-07T16:19:04+5:302024-09-07T16:36:44+5:30
अभय व्हनवाडे रुकडी/माणगाव : नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या माणगाव ग्रामपंचायतीने आता महिला व बाल सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाच्या आधारे अॅप ...
अभय व्हनवाडे
रुकडी/माणगाव : नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या माणगाव ग्रामपंचायतीने आता महिला व बाल सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाच्या आधारे अॅप तयार केले आहे. सध्या महिला व बालिकेवर राज्यामध्ये विविध ठिकाणी अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटना घडू नये व घडल्यास त्याची तात्काळ माहिती कळावी व संरक्षण मिळावे याकरिता या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
महिला व बाल सुरक्षासह आत्मसंरक्षणासाठी मोबाईलमध्ये माणगाव ग्रामपंचायतकडून 'निडली एसओएस' हे अॅप उपलब्ध करून दिले जात आहे. कोणीही मोबाईल हिसकावून घेत पॅटर्न अनलॉक करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा फोटो आपोआप निघणार. झटापटी दरम्यान अथवा अडचणीच्यावेळी चार वेळा पावर बटन दाबण्याचा किंवा ॲपमधील एसओएस बटन दाबल्यास मोबाईल धारकांच्या कुटुंबातील चार सदस्यांना ती व्यक्ती जिथे आहेत तिथली माहिती मिळण्याची सुविधा तयार करण्यात आली आहे. याशिवाय घटनेची तीव्रता पाहून तात्काळ महिला अत्याचार प्रतिबंधक पोलीस विभागाकडील ११२ नंबरला संपर्क करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
माणगाव ग्रामपंचायतीने मुलींच्या विवाहाप्रसंगी माहेरीची साडी, रूकवत भांडी संच, मुलगी जन्मल्यास कन्या सन्मान योजना राबविले असून आता महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन अॅपची सुविधा उपल्ब्ध केल्याने नागरिकांमधून स्वागत होत आहे.
माणगाव येथील महिलांना सुरक्षा देण्याकरिता या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय या अॅपचा वापर सर्वांना करता येणार आहे. याचा सर्व खर्च माणगाव ग्रामपंचायत करणार आहे. भविष्यात यामध्ये आणखीन काही सुविधा देता येतील का यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. - डॉ. राजू मगदूम, सरपंच