अपात्रतेवरून विभागीय सहनिबंधकाकडे १५ जणांचे अपील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:27 AM2021-04-09T04:27:29+5:302021-04-09T04:27:29+5:30
कोल्हापूर: गोकूळ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी भारती डोेंगळे, बाबा नांदेकर, गंगाधर व्हसकोट्टी वसंतराव धुरे यांच्यासह ...
कोल्हापूर: गोकूळ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी भारती डोेंगळे, बाबा नांदेकर, गंगाधर व्हसकोट्टी वसंतराव धुरे यांच्यासह १५ जणांनी विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली. यात दहा जणांनी ऑनलाइन पद्धतीने तर ५ जणांनी प्रत्यक्ष जाऊन अर्ज केले. यावर आता गुरुवारी (दि.१५) सुनावणी होणार आहे.
गोकूळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकींतर्गत छाननीमध्ये अनेकांचे अर्ज अपात्र ठरले. दूध पुरवठा व पशूखाद्य उचलीच्याबाबतीत असणाऱ्या अटीवर आक्षेप घेत अपात्र ठरलेल्यांना अपीलाची सुट देण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी १५ जणांनी विभागीय सहनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे अर्ज दाखल केले. यात राधानगरीतून कासारवाडा येथील शरद पाडळकर, तुरंबे येथून उमर पाटील, चंद्रे येथून दिनकर पाटील, घोटवडे येथून भारती डोंगळे, पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथून बळवंत कांबळे, यवलूज येथील शशिकांत आडनाईक व मानसिंग पाटील, करवीर तालुक्यातील शाहूनगर परिते येथून अजित पाटील, गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील गंगाधर व्हसकोट्टी, महागाव येथून विनायक पाटील व आण्णासाहेब पाटील, उत्तूरमधून वसंतराव धुरे, भूदरगड तालुक्यातील नांदोली येथील यशवंत ऊर्फ बाबा नांदेकर, कागल तालुक्यातील बामणी येथील मारुती पाटील यांचा समावेश आहे.
चौकट ०१
एकही माघार नाही
गोकूळ दूध संघाच्या २१ जागासाठी ४८२ जणांनी दावेदारी दाखल केली होती; पण छाननीत यातील ७५ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे अजूनही २४१ जण रिंगणात आहेत. त्यातील कोण माघार घेणार, याची उत्सुकता आहे. बुधवारी अरुण नरके व स्निग्धा चेतन नरके या दोघांनी माघार घेत चेतन नरके यांचा मार्ग मोकळा केला. गुरुवारी एकानेही उमेदवारी माघार न घेतल्याने सत्ताधारी व विरोधकांची डोकेदुखी वाढली आहे. माघारीसाठी २० एप्रिल ही शेवटची मुदत असली तरी अजून अकरा दिवस माघारीसाठी हातापाया पडण्याची वेळ आघाडीच्या नेत्यावर येणार आहे.