उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : क्षीरसागर
By admin | Published: October 7, 2015 12:13 AM2015-10-07T00:13:55+5:302015-10-07T00:17:53+5:30
ही मतदारयादीतील मते गायब होण्याचा घोळ हा प्रशासनाने जाणूनबुजून केल्याचा आरोप करीत ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली.
कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपल्यावरही मतदारयादीतील घोळ अद्याप मिटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही यादीतील मतदार गायब होण्याची प्रकरणे दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहेत. त्यामुळे हा जाणूनबुजून केलेला घोळ असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी सायंकाळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली तसेच आज, बुधवारी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गेली महिनाभर मतदार यादीतील घोळ सुरूच आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतरही हा घोळ संपुष्टात आला नाही. विधानसभा वेळच्या मतदार याद्या प्रभागनिहाय फोडताना मतदार गायब होण्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अनेकांची नावे गायब होतीच; पण अख्ख्या गल्ल्या दुसऱ्या प्रभागात गेल्याचे, अनेक मतांचे गठ्ठे गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर यावर मागविलेल्या हरकतीनंतरही अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या; पण मतदार गायब होण्याचा प्रकार काहीअंशी कमी झाला. पण, परिपूर्ण मतदार याद्या तयार झाल्याच नाहीत. त्यामुळे मंगळवारपासून अर्ज भरण्याच्या दिवशीही क्षेत्रीय कार्यालयातही मतदारांनी येऊन गोंधळ घातला.त्याची दखल घेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासमवेत आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन ही मतदारयादीतील मते गायब होण्याचा घोळ हा प्रशासनाने जाणूनबुजून केल्याचा आरोप करीत ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली. तसेच या मागणीसाठी आज, बुधवारी मुंबईत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली.