कृषी विम्यासाठी विभागाकडून आवाहन
By admin | Published: July 23, 2014 11:49 PM2014-07-23T23:49:33+5:302014-07-23T23:49:33+5:30
उपविभागीय कृषी अधिकारी
कोल्हापूर : राष्ट्रीय कृषी विमा योजनेची मुदत जुलैअखेर असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनाच्यावतीने रब्बी हंगाम १९९९-२००० पासून राष्ट्रीय कृषी योजना सुरू करण्यात आली. या हंगामासाठी ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. भात, खरीप ज्वारी, नाचणा, तूर व उडीद, कारळा, भुईमूग, सोयाबीन, सुर्यफूल, कांदा, ऊस या पिकांसाठी ही योजना लागू आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये सहभाग होऊ शकतो. सरासरी उत्पन्न व किमान आधारभूत किमतीशी निगडित विमा संरक्षित रक्कम हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांना १५० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त विमा संरक्षण आहे. ऊस सोडून खरीप पिकांसाठी ३१ जुलै, तर आडसाली ऊस लागणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. पूर्वहंगामी उसासाठी लागवडीपासून एक महिना अथवा डिसेंबर २०१४, तर सुरू उसासाठी मार्च २०१५ पर्यंत मुदत आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तलाठी, कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अथवा राष्ट्रीयीकृत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)