लघुपट, मायमराठी स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:51 AM2019-11-16T11:51:44+5:302019-11-16T11:55:00+5:30
आठव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या लघुपट व माय मराठी स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्यासाठी संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : आठव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या लघुपट व माय मराठी स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्यासाठी संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या ‘किफ्फ’मध्ये जागतिक, भारतीय तसेच नवीन मराठी चित्रपट, लघुपट, दिग्दर्शक मागोवा, लक्षवेधी देश अशा विविध विभागांत चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. याअंतर्गत लघुपट स्पर्धा होत असून, त्यात ३० मिनिटे कालावधीतील लघुपटांना प्रवेश दिला जाईल. तसेच निवड झालेले लघुपट महोत्सवात दाखविले जातील. त्याचप्रमाणे २०१९ मध्ये सेन्सॉर झालेल्या नवीन मराठी चित्रपटांची स्पर्धा घेतली जाणार असून, निवड झालेले सात चित्रपट महोत्सवात दाखविले जातील.
त्यातून उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, पटकथा हे पुरस्कार दिले जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रेक्षकांच्या मतांवर प्रेक्षक पुरस्कारही दिला जातो. या दोन्ही स्पर्धांसाठी प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर असून संकेतस्थळावर प्रवेशपत्रे उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक दिलीप बापट यांनी केले आहे.