शिक्षा होण्यासाठी सूरज साखरे गँगविरोधात तक्रारी देण्याचे आवाहन--: आर. बी. शेडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:13 PM2019-05-25T13:13:30+5:302019-05-25T13:16:16+5:30
बेकायदेशीर खासगी सावकारीसह भूखंड माफियांची टोळी म्हणून बदलौकिक निर्माण झालेल्या ‘एसएस गँग’चा म्होरक्या संशयित सूरज साखरेसह साथीदारांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्यात, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
कोल्हापूर : बेकायदेशीर खासगी सावकारीसह भूखंड माफियांची टोळी म्हणून बदलौकिक निर्माण झालेल्या ‘एसएस गँग’चा म्होरक्या संशयित सूरज साखरेसह साथीदारांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्यात, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. या टोळीला शिक्षा होण्यासाठी भक्कम पुराव्याचे दोषारोपपत्र पुणे विशेष मोक्का न्यायालयात सादर केले जाणार आहे. त्यासाठी पिळवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे यांनी केले आहे.
‘एसएस गँग’चा मुख्य म्होरक्या सूरज हणमंतराव साखरे (वय २८, रा. कश्यप हाईट अपार्टमेंट, देवकर पाणंद, कोल्हापूर), त्याचे साथीदार ऋषभ सुनील भालकर (२१, रा. जनाई दत्तनगर, कळंबा रोड), पुष्कराज मुकुंद यादव (२०, रा. शिंगणापूर, ता. करवीर) हे सध्या २९ मेपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. संशयित अभी ऊर्फ युवराज मोहन महाडिक (मंगळवार पेठ), युनूस हसन मुजावर (रा. राजारामपुरी), चालक धीरज आणि पार्थ हे पसार आहेत. पोलिसांनी संशयितांच्या घरांवर छापे टाकून सावकारकीतून मिळविलेल्या बेहिशेबी मालमत्तेच्या खरेदीदस्ताच्या फाइली, बँक पासबुके जप्त केली आहेत.
जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण करून, ठार मारण्याची धमकी देऊन बेकायदेशीर खासगी सावकारीच्या व्यवहारांना दिवाणी स्वरूप देऊन, त्या व्यवहारांच्या माध्यमातून त्यांनी अनेक मिळकती, जागा खंडणी स्वरूपात, तसेच हिंसाचार करून गिळंकृत केल्या आहेत. व्याजाने पैसे देणे, मोटार वाहन गहाणवट ठेवणे, आदी बेकायदेशीर कृत्ये त्यांनी केली आहेत. या टोळीविरोधात कोणाची तक्रार असेल तर त्यांनी पोलीस मुख्यालय, आर्थिक गुन्हे शाखा येथे संपर्क साधावा, असे आवाहन शेडे यांनी केले आहे.