उद्या निपाणी बंदचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:31+5:302021-01-16T04:28:31+5:30
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर निपाणीसह बिदर भालकी व बेळगाव हा मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकमध्ये डांबला गेला आहे. तेव्हापासून मराठी ...
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर निपाणीसह बिदर भालकी व बेळगाव हा मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकमध्ये डांबला गेला आहे. तेव्हापासून मराठी माणूस अस्मितेसाठी लढत आहे, यासाठी अनेक मराठी भाषिकांनी आपले बलिदान दिले आहे.
कन्नड सक्ती आंदोलनात निपाणी भागातील श्रीमती कमलाबाई मोहिते व बारवाडचे गोपाळ चौगुले हे हुतात्मा झाले होते. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी व कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ रविवारी निपाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी विभाग व शिवसेनेच्यावतीने कडकडीत बंदचे आवाहन केले आहे. या दिवशी हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम होणार आहे.
प्रारंभी बॅनर्जी नाथ पै चौक बेळगाव नाका येथे अभिवादन करून मूक फेरीने साखरवाडी येथे सव्वाअकरा वाजता हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात निपाणीतील आजी-माजी लोकप्रतिनिधी व मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी या बंदमध्ये भागातील मराठी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.