मराठा आरक्षण याचिकेत त्रयस्थ पक्षकार म्हणून अर्ज : दिलीप पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 04:11 PM2018-12-06T16:11:07+5:302018-12-06T16:14:32+5:30
मराठा आरक्षणाविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
या याचिकेत कोल्हापूर सकल मराठा समाजातर्फे त्रयस्थ पक्षकार (इंटरवेन) म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आमचीही बाजू न्यायालय ऐकून घेईल, अशी माहिती समन्वयक दिलीप पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. मराठा द्वेषाने पछाडलेल्या मूठभर लोकांचे हे आरक्षण रोखण्याचे षडयंत्र असल्याची टीकाही त्यांनी केली.
दिलीप पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाविरोधात अॅड. सदावर्ते यांनी दाखल केलेली याचिका ही पूर्णपणे चुकीची आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. आम्ही त्यांचे आरक्षण मागत नाही किंवा कोणाचाही हिस्सा मागत नाही. हा फक्त मराठा द्वेषाने पछाडलेल्या लोकांनी पुढे केलेला चेहरा आहे.
सदावर्ते यांच्या मागे असलेल्या लोकांना लवकरच धडा शिकविला जाईल. मूठभर लोकांनी केलेले हे षडयंत्र त्वरीत थांबवावे. नाही तर मराठा समाजातील धग बाहेर पडून सामाजिक व्यवस्थेला हानी पोहोचू शकते.
सरकारनेही ही बाब लक्षात घ्यावी. कारण मराठा समाजाने आरक्षण मिळविण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचेही म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी त्रयस्थ पक्षकार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सुनावणीवेळी न्यायालय आमची बाजू ऐकून घेईल.
प्रा. जयंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाविरोधात कितीही याचिका दाखल झाल्या तरी त्याला विरोध करण्यासाठी त्याच भाषेत कायदेशीर आव्हान दिले जाईल. याबाबत राज्य शासनही सतर्क असले तरी त्यांनी अखेरपर्यंत समाजाच्या पाठीशी ठामपणे रहावे. यावेळी राजीव लिंग्रस, सचिन तोडकर, उमेश पोवार, स्वप्निल पार्टे, विजय जाधव आदी उपस्थित होते.
हाळवणकरांचे वक्तव्य ‘दादां’च्या अडचणीसाठी
मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर कोल्हापूरात भाजपसह कोल्हापूरवासीयांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे उत्साहात स्वागत केले होते. यावेळी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी आरक्षणाचा निर्णय दृष्टीक्षेपात असतानाच आंदोलन करणारे हे खंडोजी खोपडेचे वंशज असल्याची टीका केली होती. यावर प्रा. जयंत पाटील यांनी लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनावर अशा प्रकारे वक्तव्य करुन आमदार हाळवणकरांना ‘दादां’ना अडचणीत आणायचे नाही ना? अशी शंका येत असल्याचा टोला लगावला.