मलकापुरात व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:39+5:302021-04-09T04:24:39+5:30
मलकापूर : शाहुवाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने मुख्य बाजारपेठ असलेल्या मलकापूर बाजारपेठेतील ...
मलकापूर : शाहुवाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने मुख्य बाजारपेठ असलेल्या मलकापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दिनांक ३० एप्रिलपर्यंत ही दुकान बंद मोहीम सुरू राहणार असून, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मलकापूर नगर परिषदेने विशेष मोहीम सुरू केली आहे. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी दुकाने बंद करण्याचे आवाहन तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या आदेशानुसार नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी पोलीस बंदोबस्तात पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह रस्त्यावर उतरून सर्व व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.
याबाबत तहसीलदार गुरु बिराजदार म्हणाले की, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असून, तालुक्यातील आठवडा बाजारही बंद केले जाणार आहेत.