पूरक पोषण आहार भागवतोय अडीच लाख माता-बालकांची भूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:41 AM2020-05-05T10:41:18+5:302020-05-05T10:44:15+5:30
आर्थिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्हा समृध्द असल्याने आणि शासनाच्या योजनेची अंमलबजावणी चांगली होत असल्याने या जिल्ह्यात कुपोषणाने एकाही बाळाचा मृत्यू झालेला नाही. स्तनदा माता आणि गरोदर महिलांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा केला जातो.
नसीम सनदी
कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’च्या काळात खाण्यापिण्याची आबाळ होत असतानाही अंगणवाड्यातून मिळणाऱ्या पूरक पोषण आहारातून जिल्ह्यातील अडीच लाख माता-बालकांची भूक भागविली जात आहे. लाभार्थ्यांना घरपोच धान्य-कडधान्य वाटप करून कुपोषण होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. हे मिळणारे धान्य, कडधान्य कमी उत्पन्न गटातील संपूर्ण कुटुंबांचे पोषण करण्यासाठी उपयोगी ठरत आहे. कुपोषण होऊ नये याची दक्षता घेतल्यामुळे सहा महिने ते ३ वर्ष वयोगटापर्यंतची बालके, स्तनदा माता, गरोदर महिला यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे. आर्थिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्हा समृध्द असल्याने आणि शासनाच्या योजनेची अंमलबजावणी चांगली होत असल्याने या जिल्ह्यात कुपोषणाने एकाही बाळाचा मृत्यू झालेला नाही.
कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडीत नोंदणी केलेल्या ६ महिने ते ३ वर्षांच्या बालकांना, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. अंगणवाड्यांमध्येच शिजवलेले अन्न बालकांना दिले जात होते, पण मध्यंतरी आहारावरून तक्रारी आल्यानंतर तयार ऐवजी कच्चे धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार लाभार्थ्यांना वयोगटानुसार धान्य व कडधान्याचे वाटप सुरू झाले. लॉकडाऊनमुळे पूरक पोषण आहार वाटपाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण राज्याच्या महिला व बालविकास विभागाने तातडीने निर्णय घेऊन धान्य, कडधान्य घरपोच देण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यातील ४ हजार ३६९ अंगणवाड्यांतून २ लाख ४२ हजार ४७ लाभार्थ्यांना शंभर टक्के वाटपही झाले आहे.
मिळणारे धान्य व कडधान्य
हरभरा डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, चवळी, तांदूळ, गहू, तिखट पूड, हळद, मीठ, गोडेतेल.
- जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या : ४ हजार ३६९
- ६ महिने ते ३ वर्षापर्यंतची मुले : १ लाख २ हजार १२६
- तीव्र कमी वजनाची मुले : १ हजार ९१७
- गरोदर व स्तनदा माता : ३६ हजार ४१६
- ३ वर्ष ते ६ वर्षाची मुले : १ लाख १ हजार ५८८
सामाजिक वॉच..
कोल्हापूर हे चळवळीचे शहर आहे. त्यामुळे रेशनधान्यापासून ते पोषण आहारापर्यंतचे धान्य लोकांना नीट मिळते की नाही याकडे जनतेचे लक्ष असते. धान्य कमी मिळाले किंवा कमी प्रतीचे मिळाले तर लोक अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारतात. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पुरेसे पालन करूनच या आहाराचे वाटप झाले आहे.
आहाराबरोबरच शिक्षणही
जिल्ह्यातील अंगणवाड्यांची गुणवत्ता राष्ट्रीय पातळीवर गौरवली गेली आहे. आकार या शिक्षण प्रणालीमुळे अंगणवाड्यांमध्ये येणाºया बालकांचा बौध्दिक विकासही झपाट्याने होत आहे. लॉकडाऊनमुळे अंगणवाड्या बंद असतानाही घरपोच धान्य-कडधान्य देऊन माता बालकांच्या आहाराची काळजी घेतानाच त्यांचे शिक्षण व प्रबोधन होईल याकडे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचा विशेष कटाक्ष आहे. व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना रोजच्या रोज अंगणवाडी सेविकांकडून आरोग्याचे व अभ्यासाचे धडे दिले जात आहेत.
मार्च व एप्रिल या दोन महिन्यांतील पूरक पोषण आहाराचे धान्य एकदमच मिळाले आहे. याची गुणवत्ताही चांगली असल्यामुळे माझ्यासह कुटुंबीयदेखील आवडीने खातात. कडधान्ये मोफत मिळत असल्याने त्यावरील आमचा खर्च कमी झाला आहे.
शिवानी भुरावणे,
स्तनदा माता
अंगणवाड्यांमध्ये धान्य आल्यावर सेविका व मदतनीस स्वत:हून मोबाईलवर संपर्क साधून ते घेऊन जाण्यास सांगतात. बालकांच्या वयोगटानुसार त्याचे पाकीट देतात. दोन महिन्यांतून एकदा ऐवजी दर महिन्याला ते मिळाले तर त्याचा दर्जाही चांगला राहील.
नजमा नाईक,
३ वर्ष वयोगट बालकांचे पालक
बालके व मातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जिल्हा परिषद कायमच आग्रही राहिली आहे. जिल्हा कुपोषणमुक्त राहण्यासाठी ७ हजार ४१६ अंगणवाडी कर्मचारी यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षणही करीत आहेत. धान्याच्या स्वरूपात मिळणारा आहार वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी यंत्रणेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे तक्रारीस वाव राहिलेला नाही. तरीदेखील तक्रार आल्यास त्याची तातडीने दखल घेतली जात आहे.
सोमनाथ रसाळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, कोल्हापूर