Kolhapur Politics: अप्पी पाटील, नंदाताईंच्या विधानसभा उमेदवारीला 'महाविकास'मधून विरोध; गडहिंग्लज येथील बैठकीत एकमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 01:42 PM2024-07-11T13:42:59+5:302024-07-11T13:44:29+5:30

चंदगडमधून इच्छुकांची गर्दी

Appi Patil, Nandatai Babhulkar candidature from Chandgad assembly constituency opposed by Mahavikas Aghadi | Kolhapur Politics: अप्पी पाटील, नंदाताईंच्या विधानसभा उमेदवारीला 'महाविकास'मधून विरोध; गडहिंग्लज येथील बैठकीत एकमत

Kolhapur Politics: अप्पी पाटील, नंदाताईंच्या विधानसभा उमेदवारीला 'महाविकास'मधून विरोध; गडहिंग्लज येथील बैठकीत एकमत

राम मगदूम

गडहिंग्लज : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात पुन्हा सक्रिय झालेल्या डॉ. नंदिनी बाभूळकर, ‘काँग्रेस’मध्ये प्रवेश केलेले जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या विधानसभेच्या उमेदवारीला एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत एकमताने झाला. मंगळवारी रात्री येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, काँग्रेसचे विभागीय समन्वयक विद्याधर गुरबे, उद्धवसेनेचे प्रमुख सुनील शिंत्रे, ज्येष्ठ शिवसैनिक रियाजभाई शमनजी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अमरसिंह चव्हाण, माजी जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली, धरणग्रस्तांचे नेते कॉ. संपत देसाई, कॉ. संजय तर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीपूर्वी गडहिंग्लज विभागात काढलेल्या ‘संविधान बचाव दिंडी’मुळेच भाजप सरकारविरोधी वातावरण तयार झाले. दिंडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी गावोगावी संपर्क मोहीम राबवली. त्यामुळेच खासदार शाहू छत्रपती यांना चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतून भरघोस मते मिळाली, असा दावाही बैठकीत केला.

शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांऐवजी लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी सक्रिय झालेल्यांस उमेदवारी दिल्यास जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. त्यामुळे नेहमी जनसंपर्कात असणाऱ्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरण्याचा आणि त्यासाठी जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांची भेट घेण्याचा निर्णयही यावेळी झाला.

'यांच्या' उमेदवारीसाठी आग्रह 

लोकसभा निवडणुकीपर्यंत अप्पी पाटील व डॉ. बाभूळकर हे लोकसंपर्कापासून दूर होते. त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य कुणालाही उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्याचेही ठरले. महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला जागा मिळाल्यास अमरसिंह चव्हाण, काँग्रेसला मिळाल्यास गोपाळराव पाटील, शिवसेनेला मिळाल्यास सुनील शिंत्रे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरण्याचे ठरले.

उमेदवारीचे दावेदार एकत्र

राष्ट्रवादीतील फुटीनंतर चंदगडविधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची अपेक्षा असतानाच उमेदवारीचे दावेदार बहुसंख्येने एकत्र आले आहेत.

चंदगडमधून इच्छुकांची गर्दी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर व माजी सभापती अमरसिंह चव्हाण, दौलतचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील व गडहिंग्लजचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे, उद्धवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, ज्येष्ठ शिवसैनिक रियाज शमनजी, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील ही मंडळी इच्छुक आहेत.

Web Title: Appi Patil, Nandatai Babhulkar candidature from Chandgad assembly constituency opposed by Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.