अप्पी पाटील राखीव गटातून रिंगणात?केडीसी,सी बँक
By admin | Published: April 23, 2015 12:52 AM2015-04-23T00:52:15+5:302015-04-23T00:54:49+5:30
छाननीत बाद झालेला राखीव गटातील त्यांचा अर्ज न्यायालयात वैध ठरला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य अप्पी पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विकास संस्था गटातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयानेही अपात्र ठरविला. मात्र, भटक्या विमुक्त जाती व जमाती गटातील त्यांचा अर्ज न्यायालयाने पात्र ठरविल्यामुळे ते राखीव गटातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
पाटील यांनी विकास संस्था व भटक्या विमुक्त जाती-जमाती या दोन्ही गटांतून उमेदवारी दाखल केली होती. मात्र, येथील शिवाजी सहकारी बँकेच्या थकबाकीवरून त्यांचे दोन्ही अर्ज छाननीत अपात्र ठरले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयात त्यांचा संस्था गटातील अर्ज अवैध, तर राखीव गटातील अर्ज वैध ठरला. या निर्णयाविरुद्धही पुन्हा न्यायालयात दाद मागितली आहे. भटक्या विमुक्त गटातील अर्ज पात्र ठरल्यामुळे ते राखीव गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
जोरदार तयारी
आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याविरोधात बंडखोरी करून पाटील यांनी चंदगड विधानसभेची निवडणूक लढविली. अनपेक्षितरित्या रिंगणात उतरूनही तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली. विधानसभेनंतर सर्व निवडणुकीत ताकदीने उतरण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’साठी अर्ज भरले. मात्र, ‘गोकुळ’मधून माघार घेऊन केडीसीसी निवडणूक लढविण्याची निर्णय त्यांनी घेतला आहे. छाननीत बाद झालेला राखीव गटातील त्यांचा अर्ज न्यायालयात वैध ठरला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.