‘प्रधानमंत्री घरकुल’चे लाखावर अर्जदार होणार अपात्र पात्रता सोडून अर्ज : पाहणीत वास्तव उघड; सहा महिने झाले तरी यादीच ठरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:38 AM2018-06-29T00:38:55+5:302018-06-29T00:39:18+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत अर्ज केलेल्या दीड लाख अर्जदारांपैकी किमान १ लाख जणांचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत अर्ज केलेल्या दीड लाख अर्जदारांपैकी किमान १ लाख जणांचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे. शासनाची योजना आहे तर अर्ज करून तरी ठेवूया म्हणून अनेकांनी अर्ज केले होते. मात्र, याबाबत जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर हे वास्तव समोर आले आहे. मात्र, सहा महिने उलटूनही याबाबतची आकडेवारी मात्र निश्चित झालेली नाही.
बाराही तालुक्यांतून या योजनेंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते. ग्रामसभेमध्ये चर्चा करून १ लाख ३७ हजार ६८० अर्ज दाखल करण्यात आले होते. गावात कुणाचा वाईटपणा घ्यायचा म्हणून ज्यांची घरे आहेत अशांनीही यातून अर्ज केल्यामुळे ही संख्या वाढली. अशातच स्थानिक राजकारणामुळे काही ठिकाणी अर्ज मंजूर केले जात नाहीत म्हणून शासनाने ग्रामसभेव्यतिरिक्तही अर्ज देण्याची सोय केली होती. त्यातून १२ हजार ५७८ अर्ज दाखल झाले होते.
गेली अनेक वर्षे दारिद्र्यरेषेखालील आणि घरकुल नसलेल्या लाभार्थ्यांची अशा यादीचा संदर्भ घेतला तर कोल्हापूर जिल्ह्यात ३३००० जणांना घरकुलांची गरज असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्याचीही छाननी केली असता त्यातील १८४६५ जणच घरकुल योजनेसाठी पात्र असल्याची आकडेवारी समोर आली होती; परंतु प्रधानमंत्री योजनेतून नव्याने अर्ज दाखल करण्याची संधी दिल्याने दीड लाखांवर हे अर्ज आले.
गेले सहा महिने या अर्जांवर छाननी सुरू असून अजूनही यातील पात्र किती आणि अपात्र किती हे निश्चित झालेले नाही. दीड लाखांपैकी १ लाख ४० हजार अर्जदारांच्या अर्जांची छाननी झाली असून अजूनही दहा हजार अर्जांची छाननी शिल्लक आहे. याबाबत स्मरणपत्रे देऊनही ही आकडेवारी प्राप्त झालेली नाही.
‘फुकटचं गावलं, बाप-ल्याक धावलं’
शासनाने एखादी योजना जाहीर केली की आधी लाभ घेतला असला तरी पुन्हा त्यासाठी कशी गर्दी उसळते याचे प्रत्यंतर या योजनेच्या माध्यमातून आले आहे. घरकुल मिळणार आहे म्हटल्यावर एका-एका घरातल्या दोघा- दोघांनी यामधून अर्ज केले आहेत. स्थानिक पातळीवर याचा अर्ज काढला आणि याचा दिला यावरून वाद होऊ नये म्हणून घरे असणाºयांचेही अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी प्रत्येक अर्जदार सध्या कुठे राहतोय, त्या ठिकाणी जाऊन खात्री करण्याची सक्ती केल्याने दीड लाखांपैकी लाखावर अर्जच बाद होण्याची शक्यता आहे.
ग्रामसेवकांचा होता सर्वेक्षणाला विरोध
सर्वेक्षणाला काही ग्रामसेवक संघटनांनी पहिल्यांदा विरोध केला होता. ‘गावपातळीवर आम्ही कुणाच्या दारात जावून तुम्ही पात्र आहे, अपात्र आहे, असे स्पष्टपणे सांगणार, राजकीय दबाव येतो’ असे कारण सांगत काही नेते डॉ. खेमनार यांच्याकड गेले होते.
परंतु डॉ. खेमनार यांनी हे शासकीय काम आहे, तुम्हाला वाईटपणा घ्यावा लागेल, त्याला पर्याय नाही, असे सांगितल्यानंतर हे काम मार्गी लागले.