राष्ट्रवादीच्या दुर्वास कदम यांचा अर्ज अवैध
By Admin | Published: September 30, 2014 01:01 AM2014-09-30T01:01:09+5:302014-09-30T01:06:18+5:30
१५ जणांचे अर्ज वैध : पक्षाच्या नावातील चुकीचा फटका बसला
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीन अर्ज आज, सोमवारी झालेल्या छाननीत अवैध ठरले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या दुर्वास परशराम कदम, अपक्ष सर्जेराव अण्णा पाटील आणि भाजपच्या शोमिका अमल महाडिक यांचा समावेश आहे.
करवीर तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांच्यासमोर छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली. ‘दक्षिण’ मतदारसंघासाठी दुर्वास कदम यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, अर्जात त्यांनी पक्षाचे अधिकृत असलेल्या ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी’ या नावाऐवजी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ असा उल्लेख केल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. तसेच पाचगावमधील सर्जेराव पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला होता. यात त्यांनी अर्जातील ‘क’ हा रकाना निरंक ठेवला होता. तसेच त्यांनी स्वाक्षरी केली नव्हती. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. भाजपकडून शोमिका महाडिक यांना पक्षाने ए.बी. फॉर्म दिला नसल्याने त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरला.
‘कोल्हापूर दक्षिण’साठी एकूण १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन अवैध ठरल्याने आता १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये माजी मंत्री सतेज पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस), अमल महाडिक (भारतीय जनता पार्टी), नूरमहंमद सरखवास (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), विजय देवणे (शिवसेना), राजू दिंडोर्ले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रवींद्र कांबळे (बहुजन समाज पार्टी), आदींचा समावेश आहे.
(प्रतिनिधी)