‘तंत्रनिकेतन’साठी आजपासून अर्ज
By admin | Published: June 16, 2015 12:51 AM2015-06-16T00:51:45+5:302015-06-16T00:51:45+5:30
‘आॅनलाईन’ प्रवेश प्रक्रिया : विविध अभ्यासक्रमांसाठी ८०० जागा; २९ जूनपर्यंत मुदत
कोल्हापूर : शासकीय तंत्रनिकेतन (गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक)मधील सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, अशा विविध पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया आज, मंगळवारपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश आॅनलाईन करावे लागणार असून, त्यासाठीची अंतिम मुदत २९ जून आहे. प्रवेशाच्या तीन फेऱ्या (कॅप राऊंड) होणार आहेत.
येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, शुगर मॅन्युफॅक्चरर्स, आयटी, फौंड्री/मेटालार्जी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रमांच्या ८०० जागा आहेत. तंत्रशिक्षण संचालनालया-कडून मिळालेल्या सूचनांनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रवेश प्रक्रिया समन्वयक एम. एस. कागवाडे यांनी सांगितले. कागवाडे म्हणाले, तंत्रनिकेतनमधील प्रवेशासाठी तीन फेऱ्या होणार असून, यातील दोन फेऱ्या कॅप राऊंडच्या असून, अखेरची फेरी कौन्सेलिंग पद्धतीने होईल. प्रवेशाबाबतची अधिक माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या ६६६.३िी.ङ्म१ॅ.्रल्ल/स्रङ्म’८ 2015 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशासाठी आठवी, नववी आणि दहावीची गुणपत्रके, डोमेसाईल सर्टिफिकेट अथवा जन्म दाखला यांच्या छायांकित प्रती आणि मूळ प्रती आवश्यक आहेत. अर्जात भरल्यानुसार पहिला पर्याय मिळाल्यास त्याठिकाणी विद्यार्थ्याने प्रवेश घेणे आवश्यक आहे; अन्यथा तो प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. (प्रतिनिधी)
सांकेतिक क्रमांकाद्वारे अर्ज
विद्यार्थ्यांना अर्ज स्वीकृती केंद्रातून प्रवेश अर्ज घेऊन मिळणाऱ्या सांकेतिक क्रमांकाद्वारे ‘आॅनलाईन’ स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे. प्रवेश किटची खुल्या वर्गासाठी ४००, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये किंमत आहे. यात प्रवेशासाठी आवश्यक असणारा आयडी आणि पासवर्ड असतो. त्याद्वारे विद्यार्थ्यांना ‘नेट कॅफे’ अथवा इंटरनेटची सुविधा असणाऱ्या ठिकाणांवरून आॅनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर त्याची प्रिंट घेऊन तो गुणपत्रिकांच्या छायांकित प्रतींसह शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जमा करावा लागणार आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २९ जूनपर्यंत आपल्या मूळ गुणपत्रिकांची छाननी अर्ज स्वीकृती केंद्रात (एआरसी) जाऊन करावयाची आहे. शहरात शासकीय तंत्रनिकेतन, न्यू पॉलिटेक्निक, डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, डॉ. बापूजी साळुंखे पॉलिटेक्निक, आदी ठिकाणी ‘एआरसी’ आहेत.