छापील उमेदवारी अर्ज स्वीकारणार

By admin | Published: October 9, 2015 01:23 AM2015-10-09T01:23:30+5:302015-10-09T01:27:52+5:30

महापालिका निवडणूक : आॅनलाईन बंद; आॅफलाईन सुरू

The application for printed candidature will be accepted | छापील उमेदवारी अर्ज स्वीकारणार

छापील उमेदवारी अर्ज स्वीकारणार

Next

कोल्हापूर : प्रभाग रचना, चुकीचे आरक्षण आणि प्रारूप मतदार याद्यांपाठोपाठ आता आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची पद्धतही उमेदवार तसेच राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘आॅनलाईन’चा प्रचंड मनस्ताप सहन करायला लागल्यामुळे उमेदवारांची घालमेल वाढली होती. त्याची दखल घेत गुरुवारी सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाने आॅनलाईनला उमेदवारी अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने परंपरागत पद्धतीने छापील अर्ज भरून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
मनपा निवडणुकीसाठी आॅनलाईन उमेदवारी अर्ज व शपथपत्र भरणे बंधनकारक केले होते. तथापि, इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज अपलोड होणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने आज, शुक्रवारपासून आॅफलाईन पद्धतीने (जुन्या पद्धतीने) अर्ज स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार दि. ९ ते १३ आॅक्टोबरपर्यंत सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे छापील उमेदवारी अर्ज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी छापील अर्ज शपथपत्रासह द्यावेत, असे रात्री महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ संगणकावर खुले होत नव्हते. तो दोष दूर झाला आणि बुधवारपासून आॅनलाईनवर अर्ज भरण्यात अडचणी येऊ लागल्या. शपथपत्रातील उमेदवाराच्या संपत्तीविषयक तसेच गुन्हेविषयक माहिती भरल्यानंतर त्याची प्रिंट काढल्यानंतर ती प्रिंट कोरी येत होती तसेच महाआॅनलाईनच्या संगणक स्क्रीनवरसुद्धा ही माहिती पाहायला मिळत नव्हती. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, अशा उमेदवारांना त्याचा तपशील द्यायचा असून त्या गुन्ह्याखाली किती शिक्षा होऊ शकते हेही लिहावे लागणार आहे.
आॅनलाईनवरील या क्लिष्ट प्रक्रिया पाहून काही उमेदवारांनी निवडणूक कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष संगणकावर बसून प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. त्यावेळी अधिकारी,कर्मचारीही चक्रावून गेले. त्यांनाही तसाच अनुभव येऊ लागला.
‘महाआॅनलाईन’च्या संकेतस्थळावर आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणींमुळे उमेदवारांनी क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली . राष्ट्रवादीचे नेते आर. के. पोवार यांनी सायंकाळी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर या अडचणी मांडल्या. (प्रतिनिधी)

प्रशासनासमोर अडचणींची मालिका
महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवस झाले आहेत; परंतु निवडणूक प्रक्रियेतील अडचणी काही संपत नाहीत. आधी प्रभाग रचनेत गोंधळ झाला. त्यानंतर आरक्षण टाकण्यात चूक झाली. प्रारूप मतदार याद्यांतील दुरूस्ती करता करता अधिकाऱ्यांच्या तोंडी फेस आला आहे. हा फेस वाळत नाही तोवरच गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक यंत्रणेला नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अडचणींची एक-एक मालिकाच प्रशासनासमोर उभी राहत आहे.

तिसऱ्या दिवशी एकही अर्ज नाही
तिसऱ्या दिवशी निरंक पितृपंधरावड्याची धास्ती घेतलेल्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशीही निवडणूक कार्यालयाकडे पाठ फिरविल्याने गुरुवारी एकही अर्ज दाखल झाला नाही; मात्र इच्छुक उमेदवारांकडून सर्वच कार्यालयांतून चौकशी, शंका विचारल्या जात होत्या. तीन दिवसांत केवळ व्हीनस कॉर्नर प्रभागातून एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

...अन् आयोगाकडून निर्णय मागे
आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी शहराच्या सर्वच भागांतून येत असल्याने गुरुवारी प्रशासनाने त्यांची खात्री करून घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनाही तसेच अनुभव आले. त्यामुळे आयुक्त पी. शिवशंकर यांनी तातडीने दुपारी महाआॅनलाईनच्या अधिकाऱ्यांना माहिती कळविली. या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करून द्या, अशी सूचनाही त्यांनी केली. या अडचणी लक्षात घेऊन आयोगाने आॅनलाईनला उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा निर्णय मागे घेत परंपरागत पद्धतीने छापील अर्ज भरून घेण्याचे निर्देश दिले. यामुळे इच्छुक उमेदवारांचे आॅनलाईन अर्ज भरताना होणारी दमछाक थांबणार आहे.

Web Title: The application for printed candidature will be accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.