अकरावी प्रवेशासाठी पहिल्या दिवशी १८५० विद्यार्थ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:15+5:302021-08-26T04:26:15+5:30

कोल्हापूर : शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाची केंद्रीय प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ...

Applications of 1850 students on the first day for 11th admission | अकरावी प्रवेशासाठी पहिल्या दिवशी १८५० विद्यार्थ्यांचे अर्ज

अकरावी प्रवेशासाठी पहिल्या दिवशी १८५० विद्यार्थ्यांचे अर्ज

Next

कोल्हापूर : शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाची केंद्रीय प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. या प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील एकूण १८५० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले. अर्ज भरण्यासाठी निवृत्ती चौक, मिरजकर तिकटी, राजारामपुरी, आदी परिसरातील नेटकॅफे, इंटरनेटची सुविधा असलेल्या ठिकाणी विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली.

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी सुरू झाली. सकाळी अकराच्या सुमारास शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या (www.dydekop.org) या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. नेटकॅफे, इंटरनेटची सुविधा असणाऱ्या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजल्यापासून विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत आले होते. अर्जाच्या पहिल्या भागात नाव, गुण, आदींची नोंदणी करून ऑनलाइन शुल्क भरणे, आदी होते. दुसऱ्या भागात गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड, विशेष आरक्षण, विद्याशाखा, महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम यांचा समावेश होता. सर्व्हरडाऊन सारखी तांत्रिक अडचण नसल्याने एक अर्ज भरण्यास पाच ते सात मिनिटे लागली. सायंकाळी पाचपर्यंत अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली. अर्ज करण्यासाठी दि. ३० ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

दिवसभरात दाखल झालेले अर्ज

विज्ञान : १०७५

वाणिज्य (मराठी) : २७३

वाणिज्य (इंग्रजी) :३५४

कला (मराठी) : १३२

कला (इंग्रजी) : १६

एकूण : १८५०

विद्यार्थी काय म्हणतात?

मला अकरावी कॉमर्सला प्रवेश घ्यायचा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय चांगला आहे.

-मानसी मालनकर, शिवाजीपेठ

ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचण जाणवली नाही. अवघ्या काही मिनिटात प्रक्रिया पूर्ण झाली. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचा आनंद आहे.

-अनुराग चौगले, शिंगणापूर

चौकट

मग, कागदपत्रे अपलोड कशाला?

ऑनलाइन अर्जाच्या दुसऱ्या भागामध्ये गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आदी कागदपत्रे अपलोड करायची आहे. प्रत्यक्ष प्रवेशावेळी संबंधित कागदपत्रे घेतली जात असल्याने ती ऑनलाइन अर्जात अपलोड करण्याची गरज वाटत नाही. त्याबाबत प्रवेश प्रक्रिया समितीने विचार करण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी केली.

प्रतिक्रिया

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी १८५० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. समितीने निर्धारित केलेल्या मुदतीमध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करावेत.

-सुभाष चौगुले, सचिव, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती

फोटो (२५०८२०२१-कोल-अकरावी प्रवेश ०१, ०२) : कोल्हापुरात बुधवारी अकरावी प्रवेशाची केंद्रीय प्रक्रिया सुरू झाली. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी निवृत्ती चौक परिसरातील नेटकॅफेमध्ये विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली. (छाया : नसीर अत्तार)

250821\25kol_2_25082021_5.jpg~250821\25kol_3_25082021_5.jpg

फोटो (२५०८२०२१-कोल-अकरावी प्रवेश ०१, ०२) : कोल्हापुरात बुधवारी अकरावी प्रवेशाची केंद्रीय प्रक्रिया सुरू झाली. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी निवृत्ती चौक परिसरातील नेटकॅफेमध्ये विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (२५०८२०२१-कोल-अकरावी प्रवेश ०१, ०२) : कोल्हापुरात बुधवारी अकरावी प्रवेशाची केंद्रीय प्रक्रिया सुरू झाली. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी निवृत्ती चौक परिसरातील नेटकॅफेमध्ये विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Applications of 1850 students on the first day for 11th admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.