४५० वृध्द साहित्यिक, कलाकारांचे अर्ज प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:20 AM2020-12-23T04:20:14+5:302020-12-23T04:20:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे निवड समितीच स्थापन झाली नसल्याने ४५० वृध्द साहित्यिक, कलाकार यांना मानधन मंजूर करण्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे निवड समितीच स्थापन झाली नसल्याने ४५० वृध्द साहित्यिक, कलाकार यांना मानधन मंजूर करण्याचे अर्ज निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. तातडीने समिती स्थापन करून याबाबतचा निर्णय घेण्याची गरज आहे.
महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने ही योजना असून, जिल्हा परिषदेकडून ती सनियंत्रित करण्यात येते. प्रत्येक वर्षासाठी अर्ज मागवले जातात. ही समिती त्याबाबत निर्णय घेते आणि वर्गवारीनुसार मानधन अदा केले जाते. प्रतिवर्षी डिसेंबरअखेर हे अर्ज मागवले जातात. त्यानुसार सन २०१९/२० वर्षासाठी अर्ज मागवण्यात आले होते. यासाठी सुमारे ४५० जणांनी अर्ज केले होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य पदांची निवडणूक लागली. अशातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सरकार स्थापनेसाठी विलंब झाला. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या नियुक्त्याही विलंबाने झाल्या. तेवढ्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यामुळे ही प्रक्रिया थांबली गेली. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे तातडीने ही समिती स्थापन करून या अर्जांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. पालकमंत्र्यांनी ही समिती स्थापन करावयाची आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनाही दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेचा विचार करून अध्यक्ष आणि समिती सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.
अशी असते समिती
अध्यक्ष : पालकमंत्री नियुक्त व्यक्ती
सदस्य सचिव : अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
सदस्य संख्या ७ : पालकमंत्री नियुक्ती व्यक्ती
सदस्य : जिल्हाधिकारी नियुक्त
वर्गवारीनुसार मानधन
वर्गवारी अ (राष्ट्रीय कलावंत) मासिक ३,१५० रूपये
वर्गवारी ब (राज्य कलावंत) मासिक २,७०० रूपये
वर्गवारी क (जिल्हा कलावंत) मासिक २,२५० रूपये
समितीचीच होते कोंडी
अर्ज करणाऱ्यांमध्ये भजनी मंडळामध्ये कार्यरत असणाऱ्यांचा मोठ्या संख्येने समावेश असल्याने निवड समितीची अनेकदा कोंडी होते. गावपातळी, जिल्हा परिषद सदस्य, नेते मंडळींचाही दबाव असतो. परंतु राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा अशी वर्गवारी ठरवताना समिती सदस्यांची दमछाक होते.