राजेश पाटील, मिणचेकर, हत्तरकी, स्वाती कोरी यांचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:48+5:302021-04-01T04:25:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’साठी बुधवारी आमदार राजेश पाटील, माजी आमदार सुजीत मिणचेकर, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, सदानंद ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’साठी बुधवारी आमदार राजेश पाटील, माजी आमदार सुजीत मिणचेकर, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, सदानंद हत्तरकी, ‘आजरा’ कारखान्याचे संचालक विष्णूपंत केसरकर, ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह पाटील, मधुआप्पा देसाई, माधुरी मधुकर जांभळे यांच्यासह ५४ जणांनी ७१ उमेदवारी अर्ज दाखल केले. आज, गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून इच्छुकांची झुबंड उडणार आहे.
‘गोकूळ’साठी गुरुवार (दि. २५) पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून तीन दिवस शासकीय सुट्टी वगळता उर्वरित दिवसात, बुधवार पर्यंत १८८ जणांनी २६५ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये एकानेच दोन, तीन वेळा अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी संकष्टी असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी कमी होती. ‘गोकूळ’चे विद्यमान संचालक राजेश पाटील यांनी स्वत:सह पत्नी सुश्मिता पाटील यांचा अर्ज दाखल केला. सुजीत मिणचेकर यांनी अनुसूचित जाती गटातून तर गंगाधर व्हसकोटी यांनी भटक्या विमुक्त जाती गटातून अर्ज भरला. विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या पत्नी पद्मजा आपटे यांनी सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल केला. संचालक धैर्यशील देसाई व त्यांच्या पत्नी अर्चना देसाई, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्या पत्नी माधुरी जांभळे यांनी महिला गटातून अर्ज भरला. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती डी. आर. पाटील, प्रवीणसिंह पाटील, सदानंत हत्तरकी यांच्यासह बाळासाहेब कुपेकर, सत्यजित जाधव, गंधालीदेवी संग्रामसिंह कुपेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अविनाश पाटील-राशिवडेकर त्यांच्या पत्नी तेजस्विनी, भटक्या गटातून अशोक खोत, ‘कुंभी’चे माजी उपाध्यक्ष तुकाराम पाटील, भाजपचे नाथाजी पाटील, भारत पाटील-भुयेकर, शंकरराव पाटील-वरणगेकर, श्वेता हत्तकरी, यांनीही अर्ज भरला.
आज, गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून सोमवारी (दि. ५) अर्जांची छाननी होणार असून ६ ते २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत आहे. २ मे रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
पोलीस बंदोबस्त वाढवला
मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती, त्यात पोलीस बंदोबस्त कमी असल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे बुधवारी पोलीस बंदोबस्त वाढवला होता.
दोनच व्यक्तींना प्रवेश
बुधवारी अर्ज दाखल करणाऱ्यांसोबत एक व्यक्ती अशा दोनच व्यक्तींना आत प्रवेश दिला जात होता. त्यामुळे निवडणूक कार्यालय मोकळे दिसत होते. अर्ज विक्री व स्वीकारण्याची व्यवस्था स्वतंत्र केल्याने गर्दी झाली नाही.
‘गंधालीदेवी कुपेकर यांचा तीन गटातून अर्ज
शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर यांच्या पत्नी गंधालीदेवी यांनी सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय व महिला गट असे तीन गटातून अर्ज भरले. बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील-सिरसेकर यांच्या पत्नी धनश्री यांनी महिला गटातून भरला, त्या सत्तारूढ गटाकडून इच्छुक असून २०१२ च्या पंचायत समितीच्या निवडणुकीत रूपाली धैर्यशील पाटील -कौलवकर यांच्याशी निकराची टक्कर दिली होती.
फोटो ओळी :
१) ‘गोकूळ’साठी बुधवारी आमदार राजेश पाटील व त्यांच्या पत्नी सुश्मिता पाटील यांनी अर्ज दाखल केला. (फोटो-३१०३२०२१-कोल-गोकूळ)
२) मंगळवारच्या झुंबडीनंतर बुधवारी मात्र अर्ज दाखल करण्यास फारशी गर्दी झाली नाही. त्यामुळे निवडणूक कार्यालय परिसरात असा शुकशुकाट होता. (फोटो-३१०३२०२१-कोल-गोकूळ०१)
३) राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्या पत्नी माधुरी जांभळे यांनीही अर्ज दाखल केला. (फोटो-३१०३२०२१-कोल-गोकूळ०२) (छाया- नसीर अत्तार)