आपटेंसह ‘वीरेंद्र’, ‘नविद’, ‘चेतन’, रविश पाटील यांचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:12+5:302021-03-31T04:25:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी मंगळवारी विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह वीरेंद्र मंडलिक, नविद मुश्रीफ, रणजितसिंह के. पाटील, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी मंगळवारी विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह वीरेंद्र मंडलिक, नविद मुश्रीफ, रणजितसिंह के. पाटील, चेतन नरके, रविश पाटील-कौलवकर, फिरोजखान पाटील, रमा बोंद्रे, रेखा कुराडे आदी १९५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बहुतांशजणांनी शक्तिप्रदर्शन केल्याने निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. गर्दीने निवडणूक यंत्रणाही पुरती घामाघूम झाली होती.
तीन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी सकाळी अकरापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सकाळी नऊपासूनच इच्छुक निवडणूक कार्यालयाच्या बाहेर रांगेत उभे होते. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्येकाची धांदल उडाली. ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी प्रकाश चव्हाण, नामदेव नार्वेकर, अंकुश पाटील अशा मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. नविद मुश्रीफ यांनी समर्थकांसह शासकीय विश्रामगृह येथून एकत्रित येऊन अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गणपतराव फराकटे आदी उपस्थित होते. वीरेंद्र मंडलिक यांनीही शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्याचबरोबर विद्यमान संचालक अंबरिश घाटगे, अरुंधती घाटगे, उदय पाटील-सडोलीकर, बाजार समितीचे संचालक सचिन घोरपडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, विशाल गोपाळराव पाटील, अनुराधा पाटील-सरूडकर, अभिजित तायशेटे आदींनी अर्ज दाखल केले.
गांधी टोपी आणि कपाळाला कुंकू
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येताना प्रत्येकाच्या डोक्यावर गांधी टोपी, कपाळाला भंडारा, बुक्का, कुंकू लावल्याचे पाहावयास मिळाले. इच्छुकांसह समर्थकांनीही टोप्या घातल्याने परिसर पांढरा शुभ्र दिसत होता.
‘नविद’, ‘देवकर’, ‘बोंद्रे’, ‘धुंदरे’चे दोन गटात अर्ज
नविद मुश्रीफ यांनी सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय गटात प्रत्येक दोन अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी इतर मागासवर्गीय गटातून दोन, तर सर्वसाधारणमधून एक, विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे यांनी सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय गटातून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले. दिवंगत नेते सुभाष बोंद्रे यांच्या पत्नी रमा बोंद्रे यांनी सर्वसाधारण व महिला गटातून प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले.
स्वाती कोरींसह ९६ जणांनी २८४ अर्ज नेले
अर्ज दाखल करण्यास अजून दोन दिवस आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढत असून मंगळवारी ९६ व्यक्तींनी तब्बल २८४ अर्ज नेले. यामध्ये गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, सचिन घोरपडे, कर्णसिंह गायकवाड, राहुल देसाई, रवींद्र मडके, धनाजीराव देसाई आदींचा समावेश आहे. अर्ज दाखल केलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे.
रेखा कुराडे, अश्विनी पवार-पाटील यांचे अर्ज
ॲड. सुरेश कुराडे यांनी स्वत:सह पत्नी रेखा कुराडे यांचा, तर ‘शेकाप’च्या अश्विनी अशोकराव पवार-पाटील व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या स्नुषा स्निग्धा यांनीही अर्ज दाखल केला.