दुष्काळग्रस्तांसाठी उपाययोजना राबवा
By admin | Published: October 1, 2015 12:13 AM2015-10-01T00:13:52+5:302015-10-01T00:41:01+5:30
भारत पाटणकर : जयसिंगपूरमध्ये ‘रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंच’चे पुरस्कार प्रदान
जयसिंगपूर : दरवर्षी पाच लाख एकर जमीन औद्योगिक वसाहतींच्या नावाने घशात घातली जात आहे. महाराष्ट्रात प्रत्येकवर्षी शंभर तालुके दुष्काळग्रस्त होतात. गावाकडच्या शेतीवर भागत नसल्यामुळे शहरातील झोपडपट्टीमध्ये राहून शेतकरी गुलामी करीत आहेत. यासाठी ठोस उपाय योजना गरजेची आहे. विचार संपविण्यासाठी चांगली माणसे संपविली जात आहेत. यामुळे स्वांतत्र्याची खरी लढाई जिंकण्याची वेळ आली आहे, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.
येथील छत्रपती राजर्षी शाहू खुले नाट्यगृहामध्ये बुधवारी सायंकाळी ‘दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार विचार मंच’च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी पाटणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड होते.प्रारंभी शाहीर संजय जाधव यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विचारमंचचे अध्यक्ष बंडा मिणियार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर इंदुमती पाटणकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना ‘जीवन गौरव’, डाव्या विचारसरणीचे व श्रमिक मुक्तीदलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना ‘गौरव’, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांना ‘साहित्यरत्न’ या राज्यस्तरीय पुरस्कारासह शिरोळ तालुका स्तरावरील ‘क्रांती’ पुरस्कार कोथळी येथील कुस्ती निवेदक पै. शंकर पुजारी यांना प्रदान करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर, अॅड. सुरेश कुऱ्हाडे, अनंत दीक्षित, विठ्ठल वाघ, शंकर पुजारी, इंदुमती पाटणकर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक घोरपडे, चंद्रकांत जाधव, शंकर पाटील, इम्तियाज खान, बालवीर पाटील, मनोज डिगे, चिदानंद आवळेकर, गजाधन मानधना, बाबगोंडा पाटील, पदाधिकारी उपस्थित होते. महादेव मेथे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)