कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील नऊ प्रलंबित गुन्हे मार्गी लावा, ‘वारणे’च्या तपासावर मार्गदर्शक सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 07:44 PM2018-03-28T19:44:55+5:302018-03-28T19:44:55+5:30
कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील नऊ प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करून ते मार्गी लावा, अशा सूचना ‘सीआयडी’चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी देत कोल्हापूर परिक्षेत्राच्या कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत झाडाझडती घेतली. बुधवारी दिवसभर त्यांनी तपासणी केली.
कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील नऊ प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करून ते मार्गी लावा, अशा सूचना ‘सीआयडी’चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी देत कोल्हापूर परिक्षेत्राच्या कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत झाडाझडती घेतली. बुधवारी दिवसभर त्यांनी तपासणी केली.
दरम्यान, रामानंद हे वार्षिक तपासणीसाठी आले असतानाच वारणानगर चोरी प्रकरण पुन्हा गाजल्याने त्यांनी या चोरी प्रकरणाचा तपास कुठेपर्यंत आला आहे, त्यामध्ये प्रगती आहे का, याची चाचपणी करीत तपासासंबंधी मार्गदर्शक सूचना ‘सीआयडी’चे पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांना केल्या.
राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) पाच जिल्ह्यांचे विभागीय कार्यालय कोल्हापुरातील शनिवार पेठ येथे आहे. या कार्यालयाच्या कामकाजाची वार्षिक तपासणी करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामानंद बुधवारी कोल्हापुरात आले. त्यांनी सकाळी दहा वाजता कार्यालयास भेट देऊन पोलीस अधीक्षक डॉ. बारी यांच्यासह पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, लिपिक यांच्या मुलाखती घेतल्या.
वर्षभरात पाच जिल्ह्यांतून किती गुन्ह्यांचा तपास सुरू आहे, याची माहिती घेतली असता नऊ गुन्ह्यांचा तपास अपूर्ण असल्याचे दप्तरी दिसून आले. गुन्हे प्रलंबित का आहेत, त्यावर कोणत्या पद्धतीने तपास सुरू आहे, कोणाकडे तपास आहे, तपासामध्ये प्रगती आहे का, तपासातील त्रुटी, आदी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करीत प्रश्नांची सरबत्ती केली.
प्रलंबित नऊ गुन्हे तत्काळ मार्गी लावा, त्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करा, अशा सूचना रामानंद यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाच्या तपासातील प्रगती त्यांनी विचारून घेतली. त्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या.
कार्यालयीन अडचणी दूर करण्याची विनंती
‘सीआयडी’चे येथील कार्यालय पाच जिल्ह्यांचे आहे. ऐतिहासिक आणि मोडकळीस आलेल्या लाकडी इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर अडगळीच्या जागी हे कार्यालय आहे. येथे अधिकाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. आरोपींना स्वतंत्रपणे ठेवून त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी अद्ययावत कोठडी नाही.
अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. महिला कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम नाही. अशा बिकट परिस्थितीत या ठिकाणी काम करावे लागते. येथून हे कार्यालय अन्य ठिकाणी हलवावे. त्यासाठी नवीन जागेची आणि इमारतीची तरतूद करावी, आदी कार्यालयीन अडचणी दूर करण्याची विनंती ‘सीआयडी’च्या अधिकारी प्रशासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक रामानंद यांच्याकडे केली.