शाळांना प्रचलित धोरण लागू करा, अन्यथा १५ ऑगस्टपासून बेमुदत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:16 AM2021-07-22T04:16:09+5:302021-07-22T04:16:09+5:30
कोल्हापूर : राज्यातील सर्व अघोषित, घोषित आणि अंशत: अनुदानित शाळांना शासनाने प्रचलित धोरण लागू करावे, अन्यथा दि. १५ ...
कोल्हापूर : राज्यातील सर्व अघोषित, घोषित आणि अंशत: अनुदानित शाळांना शासनाने प्रचलित धोरण लागू करावे, अन्यथा दि. १५ ऑगस्टपासून शिक्षक आमदारांच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी बुधवारी दिला. प्रचलित धोरण लागू केल्यास राज्यातील ६० हजार परिवारांना दिलासा मिळणार आहे. शासनाला दिलेल्या आश्वासनाची जाणीव करुन देण्यासाठी पुणे येथे दि. २६ जुलै (सोमवार) रोजी इशारा मोर्चा काढण्यात येईल. त्यासह शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अघोषित शाळा व अपात्र शाळा निधीसह घोषित करून विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सेवा संरक्षण वैद्यकीय परिपूर्ती योजना लागू करावी, संचमान्यता दुरुस्ती करून द्यावी, पटसंख्येअभावी अपात्र ठरलेल्या शाळांना मागील तीन वर्षांची संचमान्यता गृहित धरून पात्र करावे, सर्व अंशतः अनुदानित शाळांचे मासिक वेतन नियमितपणे वेळेवर करावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा अन्यथा दि. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर ढोल, थाळीनाद आंदोलन, मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर याबाबत शासनाने काहीच कार्यवाही केली नाही, तर दि. १५ ऑगस्टपासून सर्व शिक्षक आमदारांच्या दारात बेमुदत आंदोलन केले जाईल, असे खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.