महाराणी ताराराणी यांच्या जन्मतारखेच्या शोधासाठी समिती नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:35+5:302021-04-17T04:24:35+5:30

पन्हाळा - लोकमत न्यूज नेटवर्क : छत्रपती ताराराणी यांच्या जन्मतारखेच्या शोधासाठी समिती नेमून त्यांची जन्मतारीख समस्त मराठा साम्राज्याच्या पुढे ...

Appoint a committee to find out the date of birth of Maharani Tararani | महाराणी ताराराणी यांच्या जन्मतारखेच्या शोधासाठी समिती नेमा

महाराणी ताराराणी यांच्या जन्मतारखेच्या शोधासाठी समिती नेमा

Next

पन्हाळा - लोकमत न्यूज नेटवर्क : छत्रपती ताराराणी यांच्या जन्मतारखेच्या शोधासाठी समिती नेमून त्यांची जन्मतारीख समस्त मराठा साम्राज्याच्या पुढे आणावी, अशी मागणी राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद संघटनेचे महेश पाटील-बेनाडीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाराणी ताराराणी या जगाच्या इतिहासातील एक महापराक्रमी स्त्री आहेत. एका बलाढ्य साम्राज्याच्या बादशहाला नेस्तनाबूत करणारी कर्तृत्ववान महिला म्हणून एकमेव ताराराणी यांचे नाव घ्यावे लागते. अशा या महान महिलेचा इतिहास अजूनही म्हणावा इतका लोकांसमोर आलेला नाही. या विषयावर स्वातंत्र्यपूर्व काळात राजर्षी शाहू महाराजांनी स्मारके बांधून ताराराणींचा इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध इतिहासकारांनी त्यांचे चरित्र लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

महाराणी ताराराणींच्या संबंधित संशोधकीय घडामोडी या गेल्या ७० ते ८० वर्षांतील आहेत; परंतु यांच्यावर सखोल संशोधन करणाऱ्या वा लिखाण करणाऱ्या कोणीही त्यांच्या जन्मतारखेच्या वा जन्मतिथीविषयी लिहिलेले नाही व आजपर्यंत कोणताही संदर्भ साधनात मिळून आलेला नाही.

असे असले तरी संशोधकांनी सुसंगत तर्काच्या आधारावर त्यांच्या जन्मतारखेच्या वेळचे साल मात्र दिलेले आहे व ते म्हणजे शिवराज्याभिषेक साल म्हणजे इ. स. १६७४. यासाठी छत्रपती शाहू दप्तरातील काही अस्सल कागदपत्रे व पुराव्यांचा आधार घेतला आहे. या कागदपत्रांच्या आधारे महाराणी ताराराणी यांचे मृत्यू समयी वय होते ८६ वर्षांचे. याचाच अर्थ त्यांचा जन्म हा १६७४-७५ साली झाला असा संशोधकांनी सुसंगत तर्काच्या आधारे मांडले आहे व याविषयी कुणाचेही दुमत नाही.

आजपर्यंत महाराणी ताराराणींचा जन्म हा या तारखेला वा या ठिकाणी झाला असे कुठल्याही संदर्भ साधनात, कागदपत्रात वा कोणत्याही बखरीमध्ये उल्लेख केला गेलेला नाही.

म्हणून राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद संघटनेच्या वतीने अध्यक्ष महेश पाटील-बेनाडीकर मुख्यमंत्री यांना नम्र व कळकळीची विनंती करत आहेत की, आपण सत्वर महाराणी ताराराणी यांच्या जन्मतारखेच्या शोधासाठी तज्ज्ञ इतिहासकार यांची समिती नेमून त्यांच्या जन्मतारखेचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Web Title: Appoint a committee to find out the date of birth of Maharani Tararani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.