खासगी रुग्णालयांतील माहिती संकलनासाठी ४५५ शिक्षकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:37+5:302021-05-27T04:25:37+5:30
इचलकरंजी : शहर परिसरातील खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या बाह्यरुग्णांची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळावी, यासाठी ४५५ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली ...
इचलकरंजी : शहर परिसरातील खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या बाह्यरुग्णांची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळावी, यासाठी ४५५ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मृत्युदर रोखण्यासाठी प्राथमिक लक्षणे असणाऱ्यांना तातडीने उपचार सुरू करण्यासाठी या मोहिमेतून प्रशासनाला मदत होणार आहे.
शहरात सध्या ४०० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. काहीजण घरी, तर काहीजण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याचबरोबर परिसरातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यातूनही खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण, नातेवाइकांचे बाहेर फिरणे, इतर गावातील नातेवाइकांचे रुग्णांकडे येणे-जाणे सुरू असल्याने संसर्ग फैलावत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक खासगी रुग्णालयांत एका शिक्षकाची नेमणूक केली आहे. त्याद्वारे रुग्णांची माहिती, आजार, लक्षणे व उपचार असा अहवाल शासनाला मिळणार आहे. यासाठी आरोग्य विभाग व मुख्याधिकारी यांच्या आदेशाने ४५५ प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांना अॅँटिजन टेस्ट करण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.