कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 11:52 AM2021-12-28T11:52:07+5:302021-12-28T11:52:31+5:30
इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर पालिकांचा समावेश
संदिप बावचे, लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : कोरोना काळात सार्वत्रिक निवडणूका घेणे शक्य नसल्याने तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागणार असल्याने जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांवर नगरविकास विभागाने प्रशासक नियुक्त केला आहे. यामध्ये इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूरसह नऊ पालिकेवर प्रशासक बसणार आहेत. राज्य शासनाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सोमवारी उशिरा आदेश काढले आहेत.
याबाबत राज्य शासन प्रधान सचिव यांनी काढलेल्या आदेशात संपूर्ण जगभर पसरलेला साथ रोग कोविडच्या राज्यात आलेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकाकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्तीनंतर संबंधीत स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा कारभार बुधवारी (दि.29) व गुरुवारी (दि.30) रोजी प्रशासक कारभार हातात घेणार आहेत.
हे पाहणार काम
इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरूंदवाड, मलकापूर, पन्हाळा या नगरपालिकांवर मुख्याधिकारी यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. तर गडहिंग्लज, मुरगुड, वडगाव येथे प्रांताधिकारी तर कागल येथे तहसीलदार यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मुदत आज संपणार
इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरूंदवाड, मलकापूर, मुरगुड व वडगाव नगरपालिकांची मुदत आज बुधवारी तर पन्हाळा नगरपालिकेची मुदत गुरुवारी संपणार आहे.